वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर

वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर
उत्तम बिरादार यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा मन्ना येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
उदगीर : प्रतिनिधी वाढदिवसाचा उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम मौजे उमरगा मन्ना येथे पार पडला. सामाजिक कार्यकर्ते उत्तम बिरादार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
डॉ. अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडचे अध्यक्ष मा. विश्वजीत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात माजी उपसरपंच बालिकाताई पुंडलिक घोनसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष कांबळे, मुख्याध्यापक चामे सर, माणिक खडके तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.
सेवाकुंडच्या माध्यमातून प्रतिवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केली जाते. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळतो. यंदाही वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आल्याने उपस्थितांनी त्याचे कौतुक केले.
यावेळी उत्तम बिरादार यांनी सेवाकुंडच्या सामाजिक कार्याची माहिती देताना सांगितले की, शिक्षण आणि आरोग्यासोबतच शेतकरी, पाणी, अन्नदान तसेच दिव्यांग, अंध आणि अनाथांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. समाजातील गरजू घटकांना मदत मिळावी आणि त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी व्हाव्यात, यासाठी सेवाकुंडच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा हा प्रवाह पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.
उमरगा मन्ना गावातही आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजू विद्यार्थ्यांसोबत वाटून घेण्याच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.













































