ढोल-ताशांच्या गजरात उदगीरमध्ये डीजेमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक
मानाचा आजोबा गणपतीपासून मिरवणुकीला सुरुवात; फुलांचा वर्षाव आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावले

ढोल-ताशांच्या गजरात उदगीरमध्ये डीजेमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक
मानाचा आजोबा गणपतीपासून मिरवणुकीला सुरुवात; फुलांचा वर्षाव आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावले
उदगीर : प्रतिनिधी – उदगीर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला मानाचा आजोबा गणपतीपासून सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेमुक्त वातावरणात मिरवणूक उत्साहात पुढे सरकत असून, पारंपरिक वाद्यांच्या निनादाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. पावसाच्या सरी सुरू असतानाही गणेश भक्तांचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

यंदाच्या मिरवणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक गणेश मंडळांनी गुलालाचा वापर टाळून फुलांचा वर्षाव केला. तसेच मिरवणुकीत देशभक्तीपर गीतांचा निनाद होत असून, गणेश भक्त आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
विविध गणेश मंडळांनी आकर्षक देखावे साकारत मिरवणुकीत सहभाग घेतला. या देखाव्यांची निरीक्षण समितीसह मान्यवर आणि पत्रकार बांधवांनी पाहणी केली.

यावेळी उदगीर तालुक्याचे माजी मंत्री संजय बनसोडे, उदगीर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे, नगराध्यक्षा स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा शिंदे मॅडम, नगरसेवक राजकुमार हुडगे, बागबंदे, ॲड. गुलाबराव पटवारी यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
पत्रकार युवराज धोत्रे, श्रीपाद श्रीमंतकर, सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्यासह शहरातील नागरिकांनी विविध गणेश मंडळांच्या देखाव्यांची पाहणी केली. मंडळांनी साकारलेल्या देखाव्यांमधून सामाजिक आणि जनजागृतीपर संदेश देण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उदगीर शहर पोलीस निरीक्षक भीरप्पन भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडून मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
मानाचा आजोबा गणपतीपासून सुरू झालेली ही मिरवणूक ढोल-ताशांचा गजर, देशभक्तीपर गीतांचा निनाद, फुलांचा वर्षाव आणि गणेश भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पुढे सरकत आहे.















































