सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रनिवडणूकराजकारणसामाजिक कार्य

लोहा शहर वाढतेय, मग फ्लेक्स-बॅनरची गर्दी कधी हटणार? भाजीपाला विक्रेत्यांप्रमाणे अनधिकृत फलकांनाही शहराबाहेरचा रस्ता दाखवणार का?

शहराच्या वाढत्या विस्ताराला साजेसे नियोजन हवे, लोहावासीयांचा नगरपरिषद प्रशासनाला सवाल

लोहा शहर वाढतेय, मग फ्लेक्स-बॅनरची गर्दी कधी हटणार? भाजीपाला विक्रेत्यांप्रमाणे अनधिकृत फलकांनाही शहराबाहेरचा रस्ता दाखवणार का?

शहराच्या वाढत्या विस्ताराला साजेसे नियोजन हवे, लोहावासीयांचा नगरपरिषद प्रशासनाला सवाल

 

लोहा : प्रतिनिधी लोहा शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना शहराचे स्वरूपही बदलत आहे. नव्या वसाहती, वाढती लोकसंख्या, वाढती वाहतूक आणि बाजारपेठेचा विस्तार यामुळे शहरावर विकासाचे नवे चित्र उमटत आहे. मात्र दुसरीकडे शहरातील चौक, रस्ते आणि प्रमुख ठिकाणांवर लागणारे फ्लेक्स व बॅनर यामुळे शहराच्या सौंदर्याला वेगळेच गालबोट लागत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

शहरातील भाजीपाला विक्रेते आणि हातगाडी धारकांना वाहतूक व शहरातील नियोजनाच्या दृष्टीने गावाच्या बाहेरील अथवा निश्चित ठिकाणी हलविण्यात आले. मग शहरातील सार्वजनिक जागा व्यापणारे फ्लेक्स आणि बॅनर यांच्याबाबतही प्रशासन अशीच ठोस भूमिका घेणार का, असा सवाल आता लोहावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

एखादा कार्यक्रम, वाढदिवस, शुभेच्छा, राजकीय दौरा किंवा सामाजिक उपक्रम झाला की शहरातील चौक आणि रस्त्यांवर मोठमोठे फ्लेक्स उभे राहतात. काही दिवसांनी कार्यक्रम संपतो, मात्र अनेकदा त्याचे फलक जागेवरच राहतात. परिणामी शहरातील सार्वजनिक जागा जाहिरातींच्या फलकांनी व्यापली जाते.

लोहा शहराचा विकास आणि विस्तार होत असताना शहराचे सौंदर्य, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक जागांचे नियोजन याकडेही तितकेच लक्ष देण्याची गरज आहे. शहराला आधुनिक रूप द्यायचे असेल तर अनधिकृत फ्लेक्स-बॅनरच्या गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बॅनर लावण्यास पूर्णपणे बंदी घालावी, अशी भूमिका न घेता त्यासाठी ठरावीक जागा निश्चित कराव्यात, परवानगीची व्यवस्था करावी आणि ठरलेल्या कालावधीनंतर संबंधितांनी स्वतःचे फलक काढणे बंधनकारक करावे, अशी अपेक्षाही नागरिक व्यक्त करत आहेत.

भाजीपाला आणि हातगाड्यांसाठी शहराच्या वाहतुकीचा विचार करून व्यवस्था बदलता येते, तर शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत फलकांवरही नियमांची अंमलबजावणी का होऊ नये, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

लोहा शहर विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात असताना शहराच्या सौंदर्यालाही विकासाचा भाग मानले जाणार का? भाजीपाला गाडे शहराबाहेर गेले, आता फ्लेक्स-बॅनरलाही शहरातून हद्दपार करण्यासाठी नगरपरिषद ठोस पाऊल उचलणार का, याकडे लोहावासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button