जरांगे पाटलांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच; १२ सप्टेंबरला मुंबईत जमण्याचे आवाहन

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने जरांगे पाटील यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. “काहीही झाले तरी आता मागे हटणार नाही. आरपारची लढाई होणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या चार दिवसांपासून शासकीय पातळीवरून तडजोडीचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप त्यातून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या भूमिकेतही आक्रमकपणा वाढल्याचे दिसून येत आहे.
शिंदेंवरही टीकेची झोड
आतापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत तुलनेने सौम्य भूमिका घेणाऱ्या जरांगे पाटील यांनी यावेळी शिंदे यांच्यावरही टीका केली. “एकनाथ शिंदे यांना मी आतापर्यंत मराठ्यांच्या बाजूने असलेला माणूस म्हणून त्यांची वाहवा करीत होतो. पण तेही बदलले. त्या बदलाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल,” असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
“अजून पल्ला गाठायचा आहे, हे एकनाथ शिंदे यांनी लक्षात ठेवले पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यापूर्वी सातत्याने टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांनी यावेळी मात्र तुलनेने मवाळ भूमिका घेतली. “देवेंद्र फडणवीस काही करत नाहीत, ते गप्प आहेत,” असे म्हणत त्यांनी फडणवीस यांच्याबाबत “ते चांगले आहेत,” अशीही भूमिका मांडली.
बावनकुळेंवर तीव्र टीका
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मात्र जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या भूमिकेवर आणि संबंधित शासन निर्णयावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.
जरांगे पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. “माझ्या व्यंगावर कितीही हल्ले केले तरी मी मागे हटणारा माणूस नाही,” असे त्यांनी म्हटले.
प्रकृती खालावली, वैद्यकीय तपासणीस नकार
उपोषणाचा चौथा दिवस असल्याने जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवरही परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांचे वैद्यकीय पथक काल रात्री तसेच आज तपासणीसाठी उपोषणस्थळी पोहोचले. मात्र, जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला.
यापूर्वी करण्यात आलेल्या तपासणीत त्यांची रक्तातील साखर काहीशी वाढल्याचे वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आले होते. मात्र, ही तपासणी आणि त्यातील निष्कर्ष मान्य नसल्याचे सांगत त्यांनी पुढील वैद्यकीय तपासणीस विरोध केला.
अंतरवाली सराटीत भेटीगाठी वाढल्या
उपोषणस्थळी आज विविध राजकीय नेते आणि समाजातील प्रतिनिधींनी भेट देऊन जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील तसेच जालन्याचे खासदार काठे यांनी त्यांची भेट घेतली.
धाराशिव जिल्ह्यात धनगर समाजाच्या वतीने दिंडी काढून जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे रवाना झाले. दुसरीकडे, धाराशिव जिल्हा मराठा समाजाच्या वतीने मेडसी येथे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी टायर जाळण्यात आले तसेच मेडसी टोल नाक्याचे कामकाजही ठप्प करण्यात आले.
आंदोलनाला काही ठिकाणी आक्रमक स्वरूप येत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
उदय सामंत यांचा फोन, उपोषण सोडण्याचे आवाहन
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. “जरांगे पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. आमचे संबंध अत्यंत चांगले आहेत,” असे सांगत सामंत यांनी मागण्यांवर चर्चा करून तडजोडीतून मार्ग काढण्याचे आवाहन केले.
एकनाथ शिंदे यांच्याबाबत जरांगे पाटील यांच्या मनात निर्माण झालेला गैरसमज दूर व्हावा, अशी अपेक्षाही सामंत यांनी व्यक्त केली. नवी मुंबईतील आंदोलनावेळी शिंदे यांनी दिलेल्या शब्दामुळे जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जल्लोषात माघार घेतली होती, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
१२ सप्टेंबरला मुंबईत जमण्याचे आदेश
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांना आतापासूनच मुंबईकडे रवाना होण्याचे निर्देश दिले आहेत. “१२ सप्टेंबरपर्यंत सर्व मराठे मुंबईत एकत्र आले पाहिजेत. कोणीही आझाद मैदानावर जाऊ नका. मुंबईत आपल्या नातेवाईकांकडे थांबा. १२ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जायचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
मुंबईत पोहोचल्यानंतर वर्षा बंगल्याच्या छतावर बसून उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा समाजातील कार्यकर्ते टप्प्याटप्प्याने मुंबईकडे रवाना होत असल्याचे चित्र आहे. नातेवाईकांकडे राहण्याची सोय नसलेले काही कार्यकर्ते भाड्याच्या खोल्या किंवा लॉजमध्ये थांबत असल्याची माहिती आहे.
सरकारचे शिष्टमंडळ अंतरवालीकडे
जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीकडे रवाना होत असल्याची माहिती आहे. या शिष्टमंडळात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री शंभूराजे देसाई यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
या शिष्टमंडळाशी होणाऱ्या चर्चेतून काही तोडगा निघतो का, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
आंदोलन चिघळण्यापूर्वी तोडगा काढण्याची गरज
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस सुरू असून आंदोलनाला दिवसेंदिवस आक्रमक स्वरूप येत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जरांगे पाटील यांचे उपोषण तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण मिळू नये यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मेडसी येथील रास्ता रोकोसारख्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्यापूर्वी सरकारने संवादातून मार्ग काढणे आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.














































