३० जूनपर्यंतच संधी; १ जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

लातूर | प्रतिनिधी
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) प्लेट बसविण्यासाठी शासनाने दिलेली अंतिम मुदत ३० जून २०२६ रोजी संपत असून, त्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच अशा वाहनांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या शासकीय सेवांवरही निर्बंध लागू राहणार असल्याने वाहनधारकांनी तत्काळ एचएसआरपी प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन लातूर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केले आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशातील सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली असली तरी आता यापुढे कोणतीही सवलत मिळण्याची शक्यता नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
एचएसआरपी प्लेट न बसविलेल्या वाहनांवर केवळ दंडात्मक कारवाईच होणार नाही, तर अशा वाहनांशी संबंधित विविध शासकीय कामेही रोखण्यात येणार आहेत. वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, पुनर्नोंदणी, वाहनातील संरचनात्मक बदल, परवान्याचे नूतनीकरण आदी महत्त्वाच्या सेवा उपलब्ध होणार नाहीत. मात्र, वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, १ जुलै २०२६ पासून एचएसआरपी प्लेट नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १७७ अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा न करता तातडीने अधिकृत फिटमेंट सेंटरमध्ये जाऊन प्लेट बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, ज्या वाहनधारकांनी ३० जूनपर्यंत एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ऑनलाइन किंवा आगाऊ नोंदणी केली आहे, त्यांना तात्पुरती सूट देण्यात येईल. मात्र, त्यांनीही नियोजित वेळेत अधिकृत केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष प्लेट बसवून घेणे आवश्यक राहणार आहे.
वाहनांची सुरक्षा वाढविणे, वाहनांची ओळख अचूक करणे, बनावट क्रमांक प्लेटला आळा घालणे आणि गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होणे या उद्देशाने एचएसआरपी प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा दंडासह शासकीय कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे लातूर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.














































