सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रसामाजिक कार्य

परिचयातून जुळले स्नेहबंध, वाकडमध्ये आर्यवैश्य समाजाचा स्नेह सोहळा संपन्न

परिचयाच्या माध्यमातून समाजबांधवांमध्ये संवाद आणि आपुलकी वाढविण्याचा उपक्रम; एकी आणि सामाजिक प्रगतीचा संकल्प

परिचयातून जुळले स्नेहबंध, वाकडमध्ये आर्यवैश्य समाजाचा स्नेह सोहळा संपन्न

परिचयाच्या माध्यमातून समाजबांधवांमध्ये संवाद आणि आपुलकी वाढविण्याचा उपक्रम; एकी आणि सामाजिक प्रगतीचा संकल्प

वाकड, पुणे : वाकड परिसरातील आर्यवैश्य कोमटी समाजबांधवांचा सदस्य ओळख स्नेह सोहळा २०२६ उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागांतून आलेल्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजातील बांधवांमध्ये परस्पर परिचय, स्नेह आणि जवळीक वाढावी, तसेच समाजाची एकी अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने या स्नेह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच विविध भागांतून पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरात स्थायिक झालेल्या समाजबांधवांनी विविध क्षेत्रांत आपले योगदान दिले आहे.व्यापार आणि उद्योगाच्या पारंपरिक क्षेत्रासोबतच शिक्षण, वैद्यकीय, माहिती-तंत्रज्ञान, प्रशासन, नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रातही समाजबांधव कार्यरत आहेत. या विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्रकुमार पद्मावार यांनी केले. विविध भागांतून पुणे परिसरात स्थायिक झालेल्या समाजबांधवांचा परस्पर परिचय वाढविणे आणि समाजाची एकी अधिक दृढ करणे, हा उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माता कन्यका परमेश्वरी यांच्या प्रतिमेचे पूजन समितीतील सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री. व सौ. राजेश उत्तरवार यांनी माता वासवीची आरती आणि स्वागतगीत सादर केले. त्यामुळे कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण लाभले. यानंतर सदस्य परिचय सत्र घेण्यात आले. उपस्थित समाजबांधवांनी आपले मूळ गाव, सध्याचे वास्तव्य, व्यवसाय किंवा नोकरी आणि कार्यक्षेत्राची माहिती देत एकमेकांशी परिचय करून घेतला. अनेक वर्षांपासून एकाच परिसरात वास्तव्य असूनही पुरेशी ओळख नसलेल्या समाजबांधवांना या माध्यमातून एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळाली.

महिलांनी परिचय देताना पारंपरिक पद्धतीने उखाणे घेत कार्यक्रमात विशेष रंगत आणली. महिला, पुरुष आणि कुटुंबीयांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाचे वातावरण अधिक आनंदी आणि आपुलकीचे झाले.

या उपक्रमातून परिचयातून मैत्री, मैत्रीतून आपुलकी आणि आपुलकीतून समाजाची एकी हा संदेश देण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींमध्ये संवाद आणि सहकार्य वाढवून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात समाजबांधवांसाठी विविध मनोरंजक खेळ आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला, पुरुष तसेच कुटुंबीयांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे परिचयासोबतच स्नेह आणि मनोरंजनाचे वातावरण निर्माण झाले. या स्नेह सोहळ्याच्या आयोजनासाठी महेंद्रकुमार पद्मावार, गोविंद रुद्रवार, विलास तन्नीरवार, सुरेश बच्येवार, राजकुमार पोलावार, राजेश उत्तरवार, दिलीप मांडुवार, किशोर गुज्जलवार, राजेंद्र दुबे, श्रीकांत रैवणवार, किशोर रथकंठीवार, अशोक चन्नावार, डॉ. प्रदीप पेनसलवार, शिवराम बौनगुलवार आणि बालाजी रुद्रवार यांच्यासह समितीतील सदस्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भविष्यातही अशा स्नेह मेळाव्यांच्या माध्यमातून समाजातील नवीन पिढी, महिला, युवक आणि विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांना एकत्र आणण्याची गरज उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली. परस्पर परिचयातून निर्माण झालेली आपुलकी आणि सहकार्याची भावना पुढे नेत समाजाच्या एकीला बळकटी देण्याचा संदेश या स्नेह सोहळ्यातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button