कुणबी नोंदींच्या शोधाला वेग, उदगीर-जळकोटमध्ये १ लाख ४० हजार अभिलेखांची तपासणी

कुणबी नोंदींच्या शोधाला वेग, उदगीर-जळकोटमध्ये १ लाख ४० हजार अभिलेखांची तपासणी
विराळमध्ये आढळल्या ९ कुणबी नोंदी, आतापर्यंत ५८ कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रमाणपत्रे वितरित
उदगीर प्रतिनिधी
कुणबी-मराठा, मराठा-कुणबी आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी उदगीर उपविभागातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी लातूर यांच्या निर्देशानुसार उदगीर आणि जळकोट तालुक्यांमध्ये जुन्या अभिलेखांमधील कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा नोंदी शोधण्याची मोहीम राबविण्यात आली असून, या प्रक्रियेत तब्बल #१ लाख ४० हजार नोंदींची तपासणी करण्यात आली आहे.
या तपासणीदरम्यान जळकोट तालुक्यातील मौजे विराळ येथे कुणबीच्या ९ नोंदी आढळून आल्या आहेत. निजामकालीन पुरावे, महसुली अभिलेख, शैक्षणिक कागदपत्रे, वंशावळी, सनदी तसेच उपलब्ध अन्य दस्तऐवजांची नियमानुसार तपासणी करून या नोंदी शोधण्यात आल्या आहेत.

उपलब्ध नोंदी आणि पुराव्यांच्या आधारे २४ ऑक्टोबर २०२३ पासून आजअखेर जळकोट तालुक्यात ५० आणि #उदगीर तालुक्यात ८, अशी एकूण ५८ #कुणबी-मराठा, #मराठा-कुणबी व #कुणबी जात प्रमाणपत्रे वितरित किंवा निर्गमित करण्यात आली आहेत. त्यामुळे जुन्या अभिलेखांच्या तपासणीमुळे पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर होत असल्याचे चित्र आहे.
#SEBC चे ४,९१७ तर #EWS चे ८,७८५ प्रमाणपत्रे
दरम्यान, मराठा समाजाला देण्यात आलेल्या SEBC १० टक्के आरक्षणानुसार सन २०२४ ते २०२६ या कालावधीत उदगीर उपविभागात ४,९१७ SEBC प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत.
याचबरोबर EWS प्रवर्गातही मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रांचे वितरण झाले आहे. उदगीर तालुक्यात ७,४२२ आणि जळकोट तालुक्यात १,३६३, अशी एकूण ८,७८५ EWS प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत.
१० ते १७ सप्टेंबरदरम्यान मंडळ स्तरावर शिबिरे
कुणबी-मराठा, मराठा-कुणबी आणि कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरिकांना उपलब्ध पुरावे सादर करता यावेत, यासाठी १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत उदगीर उपविभागातील मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी संबंधित नागरिकांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना उपलब्ध असलेले दस्तऐवज, वंशावळ, महसुली अथवा शैक्षणिक पुरावे आणि अन्य अभिलेख नियमानुसार सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त अर्जांची उपलब्ध पुरावे आणि शासनाच्या प्रचलित नियमानुसार सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उदगीर यांच्या वतीने नागरिकांना हे आवाहन करण्यात आले आहे.















































