शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याचे निर्देश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याचे निर्देश
उदगीर : प्रतिनिधी – उदगीर तालुक्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेती पिकांवर झालेल्या परिणामाची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्यास ३० सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या विहित निकषांनुसार मदत व लाभ मिळण्यासाठी पंचनामे अचूक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्याच्या सूचना प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, उदगीर यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील शेती पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी करावी, नुकसानीचे स्वरूप आणि बाधित क्षेत्राची अचूक नोंद घ्यावी, तसेच शासनाच्या विहित निकषांनुसार पंचनामे करावेत, असे निर्देश देण्यात आले.

प्रत्यक्ष पाहणीदरम्यान पिकांची सद्यस्थिती, झालेले नुकसान, बाधित क्षेत्र आणि पंचनाम्यासाठी आवश्यक असलेल्या इतर बाबींची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनाम्याची कार्यवाही पारदर्शक, अचूक आणि विहित पद्धतीने पूर्ण करून त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्यास संबंधित यंत्रणेला सांगण्यात आले. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या कार्यवाहीसाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे. आपल्या शेतातील पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामा करण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पंचनाम्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती शासनास सादर करण्यासाठी महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाची यंत्रणा समन्वयाने कार्यरत राहणार आहे. या बैठकीस तहसीलदार उदगीर राम बोरगावकर, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, तालुका कृषी अधिकारी संदीप वलकुंदे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते.














































