सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताताज्या बातम्याराजकारणसरकारी योजनासामाजिक कार्य

उदगीरच्या रेल्वे पटरीवर स्कायवॉकसाठी पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश

उदगीरच्या रेल्वे पटरीवर स्कायवॉकसाठी पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदे

छावा मराठा संघटनेच्या निवेदनाची दखल, विशाल देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुंबईत सकारात्मक आश्वासन

उदगीर, विशेष प्रतिनिधी : उदगीर शहरातील हनुमान नगर, सिग्नल नंबर २ आणि जय संतोषी माता नगर परिसरातील हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आता प्रशासनाच्या पातळीवर पोहोचला आहे. रेल्वे पटरी ओलांडण्यासाठी या ठिकाणी स्कायवॉक किंवा अधिकृत पदचारी मार्ग उभारण्यात यावा, या मागणीसाठी छावा मराठा संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष विशाल देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई येथे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेत निवेदन सादर केले.

निवेदनाची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना “कृपया उचित कार्यवाही करावी” असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रश्नावर आता जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडून पुढील कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रोज जीव धोक्यात घालून रेल्वे पटरी ओलांडण्याची वेळ

हनुमान नगर आणि जय संतोषी माता नगर परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. या भागातील नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी तसेच आजारी व्यक्तींना दैनंदिन कामासाठी रेल्वे पटरी ओलांडावी लागते. या ठिकाणी अधिकृत पदचारी पूल किंवा भुयारी मार्ग नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ पार करावे लागतात.

पावसाळ्यात रुळांच्या परिसरात निर्माण होणारी घसरगुंडी तसेच रात्रीच्या वेळी असलेला अंधार यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षित पर्यायी मार्ग उभारण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.

स्कायवॉकसह संयुक्त पाहणीची मागणी

छावा मराठा संघटनेने प्रशासनाकडे हनुमान नगर आणि जय संतोषी माता नगर यांना जोडणाऱ्या रेल्वे पटरीवर तातडीने पदचारी पूल किंवा अधिकृत ट्रॅक पास उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती किंवा राज्य शासनाच्या विशेष निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून रेल्वे प्रशासनाकडे वर्ग करावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच उदगीर नगरपरिषद आणि रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागाची संयुक्त पाहणी करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि प्रस्तावाला गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. संयुक्त पाहणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या दिशेने पावले उचलली नाहीत, तर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन छावा मराठा संघटनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष विशाल देवणे यांनी दिला.

या शिष्टमंडळात छावा मराठा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेश चव्हाण, लातूर जिल्हाध्यक्ष उत्तम बिरादार, सामाजिक कार्यकर्ते सुभाष बिरादार (येणकीकर) यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button