मौजे तोंडचिर येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

मौजे तोंडचिर येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
उदगीर, प्रतिनिधी : उदगीर तालुक्यातील मौजे तोंडचिर येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत शनिवारी (दि. ११ जुलै २०२६) आयुष्मान आरोग्य मंदिर, तोंडचिर येथे व्यापक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
शिबिरात नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसाठी (एनसीडी) तपासणी, तसेच किशोरवयीन मुलामुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय एचएलएल (HLL) संस्थेमार्फत एचबीए1सी, लिपिड प्रोफाइल, एलएफटी, केएफटी, सीबीसी आणि टीएसएच यांसारख्या महत्त्वपूर्ण रक्त तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमुळे विविध आजारांचे लवकर निदान होण्यास मदत झाली.
या आरोग्य शिबिराचा एकूण १७५ नागरिकांनी लाभ घेतला. तपासणीनंतर संबंधित रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व आरोग्यविषयक सल्लाही देण्यात आला.
यावेळी सरपंच, उपसरपंच, डॉ. श्रद्धा डोणगावकर, अनिल आवले, आशा सेविका भाग्यश्री जाधव, अंगणवाडी सेविका लता जाधव, शिक्षिका संजीवनी जाधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती होण्यास चालना मिळाली असून, ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाच्या उद्दिष्टांना बळकटी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.













































