लातूर जिल्हाधिकाऱ्यांची उदगीर उपविभागीय व तहसील कार्यालयाला अचानक भेट; विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा

लातूर जिल्हाधिकाऱ्यांची उदगीर उपविभागीय व तहसील कार्यालयाला अचानक भेट; विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा
उदगीर, प्रतिनिधी : लातूरचे जिल्हाधिकारी भारत बासरे वाड (भा.प्र.से.) यांनी सोमवार (दि. ७ जुलै २०२६) रोजी उदगीर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच भूमी अभिलेख कार्यालयाला अचानक भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी निवडणूक विभागातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम, महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे, कार्यालयीन कामकाज आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला.
भेटीच्या सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवीन मतदारांची नोंदणी, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल, निवडणूक, दाखले, आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांना भेट देऊन कार्यालयीन कामकाजाची पाहणी करण्यात आली. नागरिकांच्या कामांचा जलद निपटारा करणे, प्रलंबित फायली वेळेत निकाली काढणे आणि कार्यालयीन शिस्त राखण्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी भारत बासरे वाड यांच्या हस्ते कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
त्यानंतर उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयाला भेट देऊन जमीन मोजणीसंबंधी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ही प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
भेटीच्या शेवटच्या टप्प्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत बीएलओंच्या कार्यक्षेत्राची पाहणी करण्यात आली. घराघरांत गणना अर्जांचे वितरण, माहिती संकलन आणि मतदारांशी संपर्क याची तपासणी करण्यात आली. बीएलओंनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून अचूक माहिती संकलित करावी तसेच नागरिकांनीही बीएलओंना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर (उदगीर), तहसीलदार राजेश लांडगे (जळकोट) तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.














































