लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
टँकरद्वारे पाणीपुरवठा व खासगी विहिरी अधिग्रहण सुरूच; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
टँकरद्वारे पाणीपुरवठा व खासगी विहिरी अधिग्रहण सुरूच; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
लातूर, दि. ३० (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नागरी तसेच ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि खासगी विहीर अथवा विंधन विहीर अधिग्रहणाच्या उपाययोजनांना ३१ जुलै २०२६ पर्यंत किंवा पुरेसा पाऊस होईपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना नियमित व सुरक्षित पाणीपुरवठा सुरू राहावा, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. स्थानिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाच्या प्रचलित नियमांनुसार नागरी व ग्रामीण भागात शेवटचा पर्याय म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच खासगी विहीर किंवा विंधन विहीर अधिग्रहित करण्याचे अधिकार संबंधित कार्यक्षेत्रातील तहसीलदारांना प्रदान करण्यात आले असून, आवश्यकतेनुसार तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन वेळेत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये आणि कोणत्याही गावात पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.















































