मतदान केंद्रावरील भत्ता वाटपात अनियमिततेचा आरोप; सखोल चौकशीची मागणी

मतदान केंद्रावरील भत्ता वाटपात अनियमिततेचा आरोप; सखोल चौकशीची मागणी
उदगीर प्रतिनिधी : मनोज जगळपुरे
उदगीर तालुक्यात पार पडलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान एका मतदान केंद्रावर भत्ता वाटपात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त पोलिस कर्मचाऱ्यांना शासनाकडून दररोज प्रत्येकी ५०० रुपये भत्ता मंजूर असताना, संबंधित मतदान केंद्रावरील केंद्र प्रमुखांनी पूर्ण भत्ता देण्यास अनिच्छा दर्शविल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मतदान केंद्रावर केंद्र प्रमुखांनी पोलिस कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा एकूण १००० रुपये भत्ता देण्याऐवजी केवळ ५०० रुपयेच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. उर्वरित रक्कम का रोखून ठेवण्यात आली, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि शिस्त अबाधित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे मत व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरणाची तातडीने आणि सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचारी तसेच नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, असा प्रकार केवळ उदगीर तालुक्यातच नव्हे तर लातूर जिल्ह्यातील इतर काही ठिकाणीही घडल्याची चर्चा आहे.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्यापक स्तरावर चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाबाबत निवडणूक प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, तसेच भत्ता वाटपाशी संबंधित अधिकृत नोंदी व कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













































