पाळज येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण उपक्रमाने महसूल पंधरवाडा कार्यक्रमाची सुरुवात.
**************
भोकर( तालुका प्रतिनिधी ) दरवर्षी वर्षी1 ऑगस्ट रोजी राज्यभरात महसूल दिन साजरा करण्यात येतो चालू वर्षी महसूल दिनापासून 1ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान राज्यभरात महसूल पंधरवाडा- 2024 हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रत्येक दिवशी महसूल विभागामार्फत विशेष मोहीम, कार्यक्रम, उपक्रम, शिबिरे, महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने महसूल दिन व महसूल पंधरवडा मोहीमेचा शुभारंभ मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
याअंतर्गत भोकर तालुक्यातील पाळज येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये उपस्थित महिलांना योजनेच्या पात्रतेचे निकष समजावून सांगण्यात आले. तसेच 21 ते 65 वयोगटातील महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी भोकर चे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी माधव केंद्रे, महिला व बालविकास अधिकारी चटलावार, मंडळ अधिकारी शेख मुसा शेख सरवर, यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तहसील कार्यालयाचे कर्मचारी व पाळज येथील महिला भगिनी यांची उपस्थिती होती.
भोकर तालुक्यात आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21000 ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यावर तालुकास्तरीय समितीतील सदस्याकडून छाननी करण्याचे काम सुरू आहे.