सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रसरकारी योजना

गॅस सेन्सर संशोधनाला आंतरराष्ट्रीय यश! स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्राध्यापकांना जर्मनीकडून पेटंट मान्यता

गॅस सेन्सर संशोधनाला आंतरराष्ट्रीय यश! स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्राध्यापकांना जर्मनीकडून पेटंट मान्यता

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयातील संशोधक प्राध्यापकांच्या संयुक्त संशोधनास जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. नॅनो-संमिश्रातून विकसित करण्यात आलेल्या या अद्ययावत गॅस सेन्सरने विषारी अमोनिया वायू ओळखणे आणि त्याची तीव्रता मोजण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

या अभिनव संशोधनामागे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. राजाराम माने यांचे मार्गदर्शन लाभले असून, प्रा. डॉ. अनिल मुगुटकर (बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत), प्रा. डॉ. संतोष जाधव (डीएसएम महाविद्यालय, जिंतूर), प्रा. डॉ. श्याम गोरे, डॉ. विजयकुमार जाधव (शिवाजी कॉलेज, उदगीर), प्रा. डॉ. उमाकांत तुंबरफळे (नांदेड), डॉ. शोएब मोहम्मद शेख (सौदी अरेबिया), प्रा. विजयपाल वाढवे (माहूर) हे या प्रकल्पात सहभागी संशोधक आहेत.

गॅस सेन्सरच्या माध्यमातून भविष्यातील अपघात आणि जीवितहानी टाळता येणार असून, याचा वापर फर्टिलायझर उद्योग, डंपिंग ग्राऊंड्स, स्वच्छता गृहे, प्रयोगशाळा, सेप्टिक टँक्स, सार्वजनिक मूत्रालये अशा अनेक ठिकाणी उपयोगी ठरणार आहे. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील या संशोधन संघाचे दुसरे पेटंट आहे, यामुळे भविष्यातील संशोधन व संधींचे नवीन दरवाजे खुली होतील, असा विश्वास डॉ. मुगुटकर यांनी व्यक्त केला.

या यशस्वी संशोधनाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, तसेच संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापकवर्ग यांनी संशोधन टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

विद्यापीठाच्या नवकल्पना व संशोधन क्षेत्रातील या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button