उदगीरच्या मयूर जगळपुरे यांची सिंगापूरच्या पहिल्या पगारातून कुटुंबाला अमूल्य भेट!

उदगीरच्या मयूर जगळपुरे यांची सिंगापूरच्या पहिल्या पगारातून कुटुंबाला अमूल्य भेट!
लोहा : कष्ट, जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर मोठी स्वप्ने साकार करणारे अनेक तरुण असतात. परंतु यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही आपल्या मुळांशी आणि कुटुंबाशी जोडलेले राहणारे मात्र काही मोजकेच. गगनभरारी घेताना पाय मात्र जमिनीवर असावे असे वाडवडीलांनी सांगितले असेल तरी त्याची अंमलबजावणी करणारे तुरळकच ! उदगीरच्या सुपुत्राची, मयूर मनोज जगळपुरे याची ही वात्सल्य कथा कुटुंबासाठी अभिमानास्पद ठरत आहे. उदगीरचा मयूर जगळपुरे हा सध्या सिंगापूर येथे PhD करीत असून, त्याचबरोबर तेथे नोकरीही करतो. परदेशात नोकरी करून मिळवलेला पहिला पगार स्वतःसाठी खर्च करण्याऐवजी, त्याने तो आपल्या कुटुंबासाठी खास क्षण बनवण्यासाठी समर्पित केला !
पहिल्या पगारातून कुटुंबासाठी अमूल्य भेट
मयूरने आपल्या आई-वडिलांच्या हस्ते आजी-आजोबांना पाच तोळे चांदीची फुले भेट दिली. ही भेट मिळताच आजी-आजोबांचे डोळे भरून आले. त्यांना मिळालेला हा मान आणि प्रेम आणि आजी-आजोबा प्रतीची भावना म्हणजे केवळ चांदीची फुले नव्हे, तर त्याच्या कृतज्ञतेची आणि नात्यांच्या घट्ट बंधांची साक्ष होती. आई-वडिलांनीही आपल्या मुलाने केलेल्या या कृतीमुळे भरभरून आनंद व्यक्त केला. “मुलगा मोठ्या देशात गेला, मोठ्या पदावर पोहोचला, पण तरीही त्याच्या हृदयात आम्ही आहोत, हे पाहून धन्य वाटते!” असे त्यांनी सांगितले.
मयूरची भावना – संस्कारांची जपणूक करणे हीच आजच्या पिढीची खरी गरज
या विशेष क्षणी मयूर म्हणाला, “मी आज जिथे आहे, ते माझ्या कुटुंबामुळे आहे. त्यांनी मला शिकवले, घडवले आणि मोठी स्वप्ने पाहण्याची हिंमत दिली. त्यामुळे पहिला पगार त्यांच्या आनंदासाठी खर्च करायचा, हे मी आधीच ठरवले होते.” या भावनेने केवळ त्याचे कुटुंबच नव्हे, तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला नात्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा संदेश दिला.
कुटुंबासाठी अभिमानास्पद क्षण
आजच्या युगात अनेक तरुण आपल्या स्वप्नांच्या मागे धावत असताना, मयूरसारख्या मुलांनी आपल्या संस्कारांची आणि नात्यांची वीण अधिक घट्ट केली आहे. शिक्षण, मेहनत आणि माणुसकी यांचे एक सुंदर उदाहरण त्याने आपल्या कुटुंबासमोर ठेवले आहे. मयूरच्या या कृतीमुळे संपूर्ण कुटुंबाने अभिमान व्यक्त केला असून, त्याच्या यशाचा गौरव केला आहे. आपल्या मुळांशी जोडून राहूनही मोठे स्वप्न साकार करता येतात, हे मयूरने कृतीतून दाखवून दिले आहे.
आजोबा.
धोंडोपंत मनोहर काप्रतवार