सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Home

8 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार; शेतकऱ्यांनी हवामानानुसार शेतीचे नियोजन करावे

8 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार; शेतकऱ्यांनी हवामानानुसार शेतीचे नियोजन करावे

मुंबई, दि. ७ : जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असली, तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः खानदेशातील धुळे व नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर व सोलापूर, पश्चिम विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची कमतरता कायम आहे.

राज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याची शक्यता असून ही परिस्थिती किमान पुढील दहा दिवस कायम राहू शकते. या कालावधीत अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित असून कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या उत्तरार्धातही पावसाचे प्रमाण पूर्वार्धाच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्या ठिकाणी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज, मातीतील ओलावा आणि उपलब्ध पाण्याची स्थिती लक्षात घेऊनच पुढील कृषी निर्णय घ्यावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button