महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे १५ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार ….
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे १५ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार ….
[कोल्हापूर प्रतिनिधी] – राज्य सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे १५ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे. दुपारी दोन ते चार या वेळेत हे आंदोलन होणार असल्याची माहिती शिक्षक समितीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षक समितीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी, एकाच वेळेला आंदोलन करुन शिक्षकांच्या विविध विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
’पंधरा मार्च २०२४ रोजीचा संच मान्यतेचा निर्णय हा जुलुमी आहे. संच मान्यतेचा निर्णय हा सर्वांसाठी घातक असून ग्रामीण शिक्षणावर घाला घालणारा आहे. शिक्षकांना ड्रेसकोड, ऑनलाइन कामाचा ससेमिरा लावणे यासह अन्य विषयांच्या सोडवणुकीसाठी आंदोलन पुकारले आहे. नवभारत साक्षरता अभियान सारखे अभियान राबवून शिक्षकांना विद्यार्थ्यापासून दूर ठेवण्याचा डावपेच सरकारचा आहे. शिवाय समूह शाळाच्या नावाखाली गरीब मुलांचे शिक्षण संपविण्याचा सरकारचा घाट आहे.” या विरोधात पुकारलेल्या आंदोलनात शिक्षकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष गणपत मांडवकर, शिक्षक समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील, समितीच्या राज्य महिला आघाडी प्रमुख वर्षा केनवडे, राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमुख पुणे विभाग हरिदास वर्णे, शरद केनवडे, प्रमोद भादिंगरे, सिद्धार्थ पाटील, युवराज काटकर, विनायक मगदूम, बाबा खोत, अस्मिता मगदूम, संजय कुंभार, सचिन कोल्हापुरे, संजय कडगावे, सुकुमार मानकर, धनाजी सासने, आनंदा डाकरे, संतोष पाटील, राजकुमार चौगुले, एकनाथ आजगेकर, विनायक चौगुले आदी उपस्थित होते.