सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रशालेय शिक्षण व क्रीडा

एनसीसी युवकांना सैन्यात भरतीसाठी प्रेरणा देते

एनसीसी युवकांना सैन्यात भरतीसाठी प्रेरणा देते

संपूर्ण भारतभर नोव्हेंबर महिन्याचा चौथा रविवार एनसीसी डे म्हणून अतिशय उत्साहात साजरा केला जातो. एनसीसी युवा भारतीयांना सैन्य दलात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी अनुकूल वातावरण पुरविण्याचे कार्य करते. एनसीसी हा एक भारतीय सैन्य दलातील प्रकार आहे . ज्याला मराठी मध्ये राष्ट्रीय छात्र सेना असे म्हणतात. 1965 व 1971 च्या भारत पाक या युद्धात एनसीसी कॅडेट्स हा दुसऱ्या नंबरचा एक भारतीय सैन्यातील संरक्षण विभाग होता. सैनिकांना शस्त्र व दारुगोळा गोळा पुरवठा करण्याचे कार्य त्यांनी केले होते.

राष्ट्रीय छात्र सेना (National Cadet Corps – NCC) ही भारतातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी असलेली एक महत्त्वाची आणि विद्यार्थीप्रिय संघटना आहे. एनसीसीची स्थापना 15 जुलै 1948 मध्ये करण्यात आली. एनसीसीचे ब्रीदवाक्य मोटो “एकता आणि अनुशासन” (Unity and Discipline) आहे. पंधरा लाखांपेक्षा अधिक एनसीसी कॅडेट्स देशभरात आहेत.

भारत देशात एनसीसी स्थापन करण्याचा उद्देश देशाप्रती आदर, निष्ठा आणि प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे ,विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व क्षमता आणि उत्तम चारित्र्य विकसित करणे, युवकांना सैन्याविषयी आवड निर्माण करून देशाच्या संरक्षणासाठी तयार करणे असा आहे.

भारतीय सैन्यात भरती होऊन कॅडेट्सनी देशाची सेवा करावी यासाठी एनसीसी मध्ये स्थलसेना (Army), नौसेना (Navy) आणि वायुसेना (Air Force) या तिन्ही दलांचे लष्करी प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना एनसीसीच्या माध्यमातून ए,बी व सी प्रमाणपत्र दिले जाते. ए प्रमाणपत्र शालेय स्तरावर म्हणजे इ. 8 वी व 9 वी या वर्गात असलेले विद्यार्थी यासाठी पात्र असतात तर बी व सी प्रमाणपत्र करण्यासाठी बी ए, बी एससी, बी काॅम या वर्गातील विद्यार्थी पात्र असतात. एनसीसीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कॅम्प करणे आवश्यक असते, त्याशिवाय विद्यार्थ्यांना एनसीसीच्या परीक्षेसाठी बसता येत नाही. एनसीसीचे ‘B’ आणि ‘C’ प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या कॅडेट्सना भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात भरती होताना तसेच इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये उदा. पोलीस दलात विशेष सूट आणि प्राधान्य मिळते. तर ‘C’ प्रमाणपत्र धारकांना काही प्रवेश परीक्षांमध्ये थेट मुलाखतीसाठीही संधी मिळू शकते. ए प्रमाणपत्र केले नसेल तरी एनसीसीचे बी व सी प्रमाणपत्र परीक्षेसाठी बसता येते. एनसीसी कॅडेट्सना पाॅईंट टू टू रायफलचे प्रशिक्षण कॅम्प मध्ये दिले जाते.

एनसीसीचा अभ्यासक्रम यात राष्ट्रीय एकात्मता, कवायत, शस्त्र प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण , समाजसेवा, मॅप रीडिंग (Map Reading), युद्ध विद्या यांसारख्या विषयांचा समावेश असतो.एनसीसी केल्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळे शारीरिक व बौद्धिक विकास होतो. कॅम्प्स आणि ट्रेनिंगमधून नेतृत्व गुणांचा विकास होतो. साहसी उपक्रमांमध्ये उदा. ट्रेकिंग, पॅरासेलिंग भाग घेण्याची संधी मिळते. समाजसेवा , सामाजिक बांधिलकीचे कार्य करण्याची संधी मिळते.

एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्राचे अनेक फायदे आहेत, ज्यात लष्करी आणि निमलष्करी दलांमधील भरतीमध्ये बोनस गुण मिळवणे, संरक्षण सेवा प्रवेश परीक्षा (CDSE) आणि थेट SSB मुलाखतीसाठी निवड होणे आणि विविध नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणे यांचा समावेश आहे. तसेच, या प्रमाणपत्रासोबत काही शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक फायदे देखील मिळतात. एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्राचे असेल तर

लष्करी सेवेत सीडीएस परीक्षा (CDS E) आणि त्यानंतरच्या SSB मध्ये ‘सी’ प्रमाणपत्र असलेल्या कॅडेट्सना ज्यांनी ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मिळवला आहे अशा कॅडेट्सना थेट SSB मुलाखतीसाठी बोलावले जाते आणि प्रवेश परीक्षा देण्यापासून सूट मिळते. तसेच लष्कर विंगमधील ‘सी’ प्रमाणपत्र धारकांसाठी भारतीय सैन्यातील काही जागा राखीव असतात.

उदा. निमलष्करी दलात बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ आणि एसएसबी यांसारख्या निमलष्करी दलांच्या भरतीमध्ये ‘सी’ प्रमाणपत्राद्वारे १०-१५ बोनस गुण मिळतात.

अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये, विशेषतः पोलीस आणि निमलष्करी दलांमध्ये, एनसीसी कॅडेट्सना आरक्षण दिले जाते.

एनसीसी कॅडेट साठी प्रत्येक नेव्ही क्रॉप्समध्ये सहा रिक्त जागा असतात. भारतीय वायुसेना दलात दहा टक्के जागा आरक्षित असतात. राज्य व केंद्र सरकारच्या नियुक्तीमध्ये एनसीसी कॅडेट्सना प्राधान्य दिले जाते. अधिकारी व डायरेक्ट जनरल ड्युटी इयत्ता दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत सूट मिळून फक्त शारीरिक पात्रता पार करुन भरती होता येते . बी एससी अग्री, इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना जादा गुण दिले जातात.

एनसीसीचा विद्यार्थी म्हणून शाळा महाविद्यालयात त्याची वेगळी ओळख असते. एनसीसी केल्यामुळे त्यांच्यांत चारित्र्य, शिस्त, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन , साहस , देशभक्ती आणि युवा नागरिकांमध्ये नि: स्वार्थ सेवेचे आदर्श विकसित होतात.डॉ. बालाजी ज्ञानोबा मुस्कावाड एनसीसी अधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button