सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘चरण सेवा’ उपक्रमाला प्रारंभ

आषाढी वारीत १२ हजार आरोग्यसेवक, ४०० मुक्कामस्थळी वैद्यकीय सुविधा; ३ हजार लिटर आयुर्वेदिक तेलाची व्यवस्था

मुंबई | प्रतिनिधी

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे ‘चरण सेवा’ उपक्रमाला प्रारंभ झाला आहे. ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमांतर्गत पालखी मार्गावरील मुक्कामस्थळी वारकऱ्यांना पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आरोग्य जनजागृतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या ११ जिल्ह्यांचा समावेश असून पालखी मार्गावरील सुमारे ४०० विश्रांती व मुक्कामस्थळी सेवा केंद्रे कार्यरत राहणार आहेत.

या अभियानात १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय व फिजिओथेरपीचे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. वारकऱ्यांच्या पायांवरील ताण, सूज, फोड, वेदना आणि स्नायूंचा थकवा कमी करण्यासाठी औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे मालिश, फिजिओथेरपी आणि प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. यासाठी सुमारे ३ हजार लिटर आयुर्वेदिक तेलाची व्यवस्था करण्यात आली असून आवश्यकतेनुसार रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

याशिवाय, आठ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती, स्वच्छता, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, पावसाळ्यातील आरोग्याची काळजी आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती केली जाणार आहे. निवडक ठिकाणी योगसत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे.

गतवर्षी राबविण्यात आलेल्या ‘चरण सेवा’ उपक्रमाद्वारे सुमारे १ लाख ७५ हजार वारकऱ्यांना थेट आरोग्यसेवा व उपचार मिळाले होते, तर १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात आला होता. यंदाही हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून लाखो वारकऱ्यांचा पायी प्रवास अधिक सुरक्षित, सुदृढ आणि सुखकर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button