शिवमहापुराण सोहळाः खा. अशोकराव चव्हाणांचे प्रशासनाला निर्देश
शिवमहापुराण सोहळाः खा. अशोकराव चव्हाणांचे प्रशासनाला निर्देश
नांदेड, दि. १९ ऑगस्टः स्थानिक कौठा परिसरातील मोदी मैदानावर २३ ते २९ ऑगस्ट दरम्यान नियोजित पं. प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण सोहळ्याच्या पार्श्वभूमिवर पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, असे निर्देश माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी दिले आहेत.
खा. अशोकराव चव्हाणांनी यांनी सोमवारी दुपारी या कार्यक्रम स्थळाची आयोजकांसमवेत पाहणी केली. पं. प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण सोहळ्याला लाखोंची गर्दी अपेक्षित असून, त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या तात्पुरत्या सुविधा उभारण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने खा. अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाशी संपर्क साधून निवास, भोजन, वाहतूक नियंत्रण, पार्किंग, सुरक्षा, स्वच्छतागृहे आदी व्यवस्थांच्या उभारणीविषयी विचारविनिमय केला. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना कार्यक्रम स्थळी येणे सुकर होईल, याकडे लक्ष द्यावे अशी सूचनाही त्यांनी केली.
खा. चव्हाण यांच्या कार्यक्रम स्थळ पाहणीच्या वेळी मुख्य संयोजक डॉ. शिवराज नांदेडकर, प्रशांत पातेवार यांच्यासह माजी आमदार अमरनाथ राजूरकर, किशोर स्वामी, संतोष पांडागळे, शरद पवार, संजय कराळे, पिंकू पोकर्णा, बालाजी पांडागळे, भारत वानखेडे, संजय गुंडावार, केशव भोसीकर, अनिल लखोटिया, युवराज वाघमारे, बाळू पारशेवार, महेश धुमसेटवार, सुशील कवठेकर, शंकर ताटे, शंकर जाधव आदी उपस्थित होते.