शाळेतील विद्यार्थिनींना अश्लील बोलणे पडले महागात
शाळेतील विद्यार्थिनींना अश्लील बोलणे पडले महागात
मानवतला जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकावर पौक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
निर्भयाच्या तक्रार पेटीतून फुटले बिंग
मानवत प्रतिनिधी.
इयत्ता आठवीच्या अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींसमोर अश्लील भाषेत शब्द उच्चारून व विनाकारण छडीने मारहाण करणाऱ्या मानवत येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्राथमिक शिक्षकाविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात पौक्सो कायद्याअंतर्गत मंगळवारी ता २ गुन्हा दाखल करण्यात आला आहे . शाळेत निर्भया पथकाने बसविलेल्या तक्रार पेटीतून सदरील प्रकार लक्षात आला असून गुन्हा दाखल झाल्याने जिल्हाभर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे .
दत्ता गंगाधर होगे वय ४५ असे त्या गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव असून तो गेल्या १ वर्षांपासून शहरातील मोंढा परिसरातील जिल्हा परिषदेच्या प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सदरील शाळेत मुख्याध्यापिका , ६ शिक्षक , १ लिपिक व १ शिपाई असून इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत वर्ग सुरू आहेत . सदरील शाळा नुकतीच नव्या इमारतीत स्थलांतरित झाली असून शाळेत गेल्या ४ ते ५ महिन्यापासून काका दीदी चे निर्भया पथक मधील महिला पोलीस अंमलदार नियमित भेट देतात व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गुड टच , बॅड टच बद्दल माहिती व शाळेत जाता येतांना कोणी पाठलाग करतात का ? त्रास देतात का ? अश्लील भाषेत कोणी बोलत आहे का याबाबाबत विचारणा करून मार्गदर्शन करत असतात . तसेच शाळेत तक्रार पेटीही बसविण्यात आली आहे .
सोमवारी ता १ सकाळी ११:३० वाजता शाळेत पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकातील पोलीस अंमलदार शकुंतला चांदीवाले व सय्यद फय्याज यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी सवांद साधला असता इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील होगे सराविरुद्ध तक्रार असल्याचे सांगत शाळेतील तक्रार पेटीत तक्रार टाकल्याचे सांगितले . सदरील तक्रार पेटी उघडली असता होगे सराविरुद्ध अनेक तक्रारी सापडल्या .
या घटनेची चौकशी केल्यानंतर शिक्षण विभागातील वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर मंगळवारी ता २ दुपारी येथील पोलीस ठाण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका छाया उमाजी गायकवाड वय ५२ रा लोकमान्यनगर परभणी यांचे तक्रारीवरून शाळेचा शिक्षक दत्ता गंगाधर होगे याच्याविरुद्ध अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींसमोर अश्लील भाषेत शब्द उच्चारून विनाकारण छडीने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय दिगंबर पाटील करीत आहेत.
तक्रार पेटी व निर्भया पथकाने प्रकरण उघडकीस
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकावर गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात सदर प्रकार हा निर्भया पथकाच्या नियमित शाळेच्या भेटीने व त्यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाने उघडकीस आला .