अपघातग्रस्त विद्यार्थ्यास मदतीचा हात
अपघातग्रस्त विद्यार्थ्यास मदतीचा हात
वसमत. प्रतिनिधी. येथील बहिर्जी स्मारक कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिक्षण घेत असलेल्या बालाजी बाबुराव जाधव या विद्यार्थ्याचा अपघात होऊन दुखापत झाली होती. या अपघातात त्याच्या पायाला दुखापत होऊन अंगठा तुटला आहे. महाविद्यालयातील हुशार परंतु परिस्थितीने गरीब असल्याने सदरील विद्यार्थ्याचा उपचाराचा खर्च कुटुंबाला झेपत नव्हता. अशावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तर्फे या विद्यार्थ्याच्या उपचारासाठी मदतीचा हात म्हणून जवळपास १२५००/- रुपयाची मदत आज रोजी मुलाच्या पालकांना सुपुर्द करण्यात आली.
आर्थिक अडचणींमुळे दवाखान्याचा खर्च परवडत नाही त्यामुळे मुलगा महाविद्यालयात उपस्थित राहु शकत नाही व त्याच्या शिक्षणावर परिणाम होत आहे, पण आपण सर्वांनी केलेल्या मदतीमुळे लवकरच तो बरा होऊन वर्गामध्ये येऊ शकेल अशी भावना पालकांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्याचे पालक उपस्थित होते.