सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
आपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य

हिंगोलीत प्रथमच भव्य आर्य वैश्य वधू-वर परिचय मेळावा – समाजाच्या एकोप्याचे प्रतीक

हिंगोलीत प्रथमच भव्य आर्य वैश्य वधू-वर परिचय मेळावा – समाजाच्या एकोप्याचे प्रतीक

हिंगोली प्रतिनिधी : विजय निलावार हिंगोली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच झालेल्या भव्य आर्य वैश्य वधू-वर परिचय मेळावा सर्वार्थाने यशस्वी ठरला. विवाह इच्छुक उपवधू-उपवर, पालक, समाजातील मान्यवर आणि उद्योजक यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया यामुळे हा मेळावा सर्वांगसुंदर ठरल्याचे सिद्ध झाले.

श्री बालाजी मित्र मंडळाच्या वतीने २३ मार्च रोजी तिरुमला लॉन, हिंगोली येथे या अभूतपूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातून तसेच शेजारील राज्यांतील अनेक विवाह इच्छुकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, देश-विदेशातील पालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या पाल्यांसाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी संवाद साधला.

मेळाव्याचे वैशिष्ट्ये :

आकर्षक मंच व रॅम्प वॉकद्वारे वधू-वर परिचय
आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर
विविध ठिकाणांहून आलेल्या समाजबांधवांचा सहभाग
आर्य वैश्य महिलांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन व सांस्कृतिक सादरीकरण
सुसज्ज खानपान व निवास व्यवस्थापन

आर्य वैश्य समाजरत्न पुरस्कार प्रदान

मेळाव्यात समाजासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल हिंगोलीचे सुपुत्र उद्योजक प्रशांत निलावार आणि सौ. सीमा निलावार यांना पहिला राष्ट्रीय आर्य वैश्य समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमदार तानाजीराव मुटकुळे आणि संतोषराव बांगर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कार स्वीकारताना सौ. सीमाताई निलावार म्हणाल्या, “मंडळाने दिलेला हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरील असला तरी, तो आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय सन्मानासारखा आहे.”

संघटन व यशस्वी आयोजन

श्री बालाजी मित्र मंडळाच्या विश्वस्त व कार्यकर्त्यांनी दोन महिने अथक मेहनत घेतल्याने हा मेळावा यशस्वी झाला. आयोजक गिरीश गुंडेवार यांनी सांगितले की, “हा मेळावा संपूर्ण समाजाचा होता, त्यामुळे नियोजन, सादरीकरण आणि प्रेमळ आतिथ्य यामुळे तो आदर्श ठरला.” आर्य वैश्य समाजाच्या या उपक्रमामुळे समाजबांधवांमध्ये एकोपा निर्माण झाला असून, दरवर्षी अशाच भव्य प्रमाणात मेळावा आयोजित करण्याची मागणी उपस्थितांकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button