आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

सोमनाथपूरची जगदंबा देवी व उदगीरची बोधनदेवी भक्ताच्या नवसाला पावणारी…

सोमनाथपूरची जगदंबा देवी व उदगीरची बोधनदेवी भक्ताच्या नवसाला पावणारी

भाविकांचे श्रद्धास्थान

 

उद्धालिक ऋषींनी केली बोधनदेवीची स्थापना सोमनाथपूरची जगदंबा तुळजाभवानी मातेचे पीठ

उदगीर, — उद्घालिक ऋर्षीच्या तपश्चर्येने पावन झालेल्या उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या पूर्वेस उदगीरची बोधनदेवी व पश्चिमेस सोमनाथपूरची जगदंबा देवीची पुरातन मंदिरे आहेत. आदिशक्ती श्री तुळजाभवानी मातेचे पीठ म्हणून सोमनाथपूरची जगदंबा देवी व उद्घालिक ऋर्षीनी धर्मरक्षणासाठी स्थापन केलेल्या बोधनदेवीचा संबंध माहूरगडच्या श्री रेणुका देवीशी जोडला जातो.
सोमनाथपूर येथील जगदंबा देवीच्या मंदिरातील जगदंबेची मूर्ती तुळजापूरच्या देवीच्या मूर्तीसारखी आहे. हे देवालय चौकोनी दगडी कट्ट्यावर बांधलेले आहे. देवालयाच्या समोर आणि दक्षिणेच्या बाजूला कमानीची धर्मशाळा आहे. मंदिरात वडाचे व पिंपळाचे विशाल वृक्ष आहेत. या मंदिराचे बांधकाम ऐतिहासिक किल्ल्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीसारखे दिसते. ४२५ वर्षापूर्वी हे देवालय बांधले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
देवालयासमोर दगडाच्या चौदा कमानी आहेत. देवालयाच्या बाजूस एक कल्लोळ आहे. या कल्लोळात स्नान केल्याने चर्मरोग नष्ट होतो, अशी आख्यायिका आहे. कल्लोळच्या टेकडीवर मरी आईचे मंदिर आहे. या जगदंबा देवीच्या मंदिराकडे येताना पुरातन काळातील श्री गणेशाचे व महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला तीर्थकुंड बांधलेले आहे. याला गोमुख पण म्हणतात. वर्षाच्या बाराही महिने गोमुखातून पाणी वाहते. या महादेव मंदिरास सोमनाथचे मंदिर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या मंदिराच्या आजूबाजूला वसलेल्या वस्तीला सोमनाथपूर नावाने ओळखले जावू लागले, अशी एक आख्यायिका आहे. नवसाला पावणारी आई जगदंबा म्हणून सोमनाथपूर येथील जगदंबा देवीची ख्याती आहे.तुळजापूरच्या जगदंबा देवीचे हे पीठ म्हणून सोमनाथपूरच्या जगदंबा देवीची ओळख आहे.


उदगीर येथील ऐतिहासिक किल्याच्या पुर्वेस जळकोट रस्त्यावर असलेल्या बोधनदेवीचे मुळ नाव ‘शीतला’ देवी असे होते. उद्घालिक ऋर्षीच्या काळी उदगीर हा अति डोंगराळ भाग होता. त्या काळी हिंदू धर्मावर अतिक्रमण होत होती. धर्मरक्षणासाठी त्यांनी काही शक्तिपीठाची स्थापना केली. त्यापैकी बोधनदेवी हे एक शक्तिपीठ आहे. या देवीचा संबंध माहूरगडाच्या श्री रेणुकादेवीशी जोडला जातो. या देवीचे दैत्य आणि दानवाच्या युगात दैत्याचा संहार करणारी उग्ररूपी एक आणि अखिल मानवाला शीतल करणारी, दया, शांती देणाऱ्या दोन रूपाचा संगम प्रवृत्ती दोन, मूर्ती दोन पण देवी एकच असा प्रत्यय असलेली बोधनदेवी हजारों भाविकांचे श्रद्धास्थान झालेली आहे. शेजारच्या आंध्र प्रदेशातील बोधनगावचा शेतकरी उदगीर येथील या शीतला देवीचा उपासक होता. चैत्री पोर्णिमा व नवरात्र महोत्सवात डोंगरदऱ्या ओलांडून हा शेतकरी उदगीरला पायी येत असत. शितला देवीच्या या भक्तास देवीने दृष्टांत दिला. तू मला तुझ्या बोधनगावी घेऊन चल. तुझ्या अनेक पिढ्यांची भरभराट होईल. त्यामुळे या भक्ताने बोधनगावी तिच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. व तिचे महात्म्य वाढविले. उदगीर येथील या मूळ शक्ती पिठास ‘बोधनदेवी’ याच नावाने भक्तगण पूजा अर्चा करतात. या देवालयाच्या बाजूला मोठी विहीर कल्लोळ आहे. या देवालयाचे पुजारी कोळी समाजाचे आहेत. आज घडीला विश्वस्त मंडळाने नामदेव आपटे यांच्यावर मंदिराच्या देखभालीची जबाबदारी सोपविली आहे. तर सोमनाथपूर येथील जगदंबा मंदिराच्या देखभालीची जबाबदारी गोसावी समाजातील पुजारी विजयगिरी गोसावी महाराज व संस्थानच्या अध्यक्षा आनंदीबाई गोसावी महाराज यांच्याकडे आहे. सोमनाथपूर व बोधनदेवी मंदिरात दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button