भोकर विधानसभा मतदार संघात मेळावे,बैठका,उद्घाटन सोहळ्यांनी राजकीय वातावरण तापले:
भोकर विधानसभा मतदार संघात मेळावे,बैठका,उद्घाटन सोहळ्यांनी राजकीय वातावरण तापले:
—————
विविध पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी
**************
उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांचा आटापिटा
****************
अनेक इच्छुक उमेदवारांची मुंबई वारी
****************
भोकर( राजकीय वार्तापत्र- बी. आर.पांचाळ)
विधानसभा निवडणुकीची तारीख केव्हाही घोषित होऊ शकते आणि आचारसंहिता लागू शकते ह्या सर्व बाबींचा विचार करून सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे,सभा मेळावे उद्घाटन सोहळे बैठका अशा विविध कार्यक्रमाने राजकीय वातावरण तापून निघाले आहे,सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून जनमत अजमावल्या जात आहे,इच्छुक उमेदवार वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून काही उमेदवारांनी मुंबईची वारी देखील केली आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी 2009 पासून या मतदार संघात आपली सत्ता प्रस्थापित करून विकास कामांना प्राधान्य दिले त्यामुळेच सर्व निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते सत्ता स्थानी राहिले 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र त्यांना जवळच्या कार्यकर्त्यांमुळे पराभव पत्करावा लागला होता लोकसभा निवडणूक 2024 च्या पूर्वी अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन भाजपात प्रवेश केला आणि राज्यसभेवर खासदार झाले,लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर होते मात्र त्यांच्यावर असलेली मतदारांची नाराजी भाजपा सरकारविरोधाचा रोष मतदारांनी दाखवून दिला आणि काँग्रेसचे उमेदवार स्व.वसंतरावजी चव्हाण यांना निवडून दिले चिखलीकर यांना पराभव पत्करावा लागला
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी
**************
भोकर विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांनी निवडणुक हालचालींना सुरुवात केली असून सभा, मेळावे,बैठका,उद्घाटन कार्यक्रम घेतले जात आहेत विधानसभेची आचारसंहिता काही दिवसातच लागणार असल्याने उमेदवारांची चाचपणी पक्षांनी सुरू केली आहे भाजपा कडून भोकर विधानसभा मतदारसंघात मागील दोन महिन्यापासून युवा नेत्या श्रीजया चव्हाण यांनी तयारी सुरू केली असून गावागावात जाऊन मतदारांच्या भेटी घेणे,त्यांच्या समस्या ऐकून घेणे,महायुती सरकारच्या योजनांची माहिती देणे यावर त्यांनी भर दिला आहे,माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी मतदार संघात दौरे सुरू केले असून बूथ कमिटीच्या बैठका,गावागावात मतदारांच्या भेटी, मेळावे,उद्घाटन कार्यक्रम आणि महायुती सरकारकडून जनसामान्य लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबत मतदारांशी संवाद साधून संपर्क अभियान भक्कमपणे राबविले आहे, 977 कोटी रुपयांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमांचा धमाकाही त्यांनी उडवून दिला, काँग्रेस महाविकास आघाडी कडून बी.आर.कदम,पप्पू पाटील कोंडेकर,बाळासाहेब रावणगावकर,अरुण चव्हाण ,कु. दामिनी ढगे, सुभाष पा.किन्हाळकर ,बालाजी गाडे,गोविंद बाबा गौड आदींनी उमेदवारीची मागणी केली आहे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा व नियोजन समितीचे सदस्य इंजि.विश्वंभर पवार यांनी जोरदार तयारी केली असून मतदारांशी संपर्क ठेवून भेटीगाठी दौरे सुरू केले आहेत, बहुजन नेते नागनाथ घीसेवाड यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले असून निवडणुकीची तयारी दर्शविली आहे, शिवसेने कडून सतीश देशमुख यांनी उमेदवारीची मागणी केली आहे, सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली असून काही इच्छुक उमेदवारांनी मुंबईला जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे संपर्क साधला आहे