आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रक्राईम वार्ताग्रामीण वार्ताराजकारणसरकारी योजना

नेवासा तालुक्यात ‘घाटकोपर’च्या पुनरावृत्ती चे संकेत.

नेवासा तालुक्यात ‘घाटकोपर’ च्या पुनरावृत्ती चे संकेत.

 

नेवासा प्रतिनिधी – नेवासा तालुक्यातील विविध ठिकाणी बेकायदा उभारलेल्या महाकाय होर्डींग्जमूळे ‘घाटकोपर’ येथील दुर्घटनेच्या पुरार्वृत्तीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जाहिरातीसाठी लावलेले महाकाय होर्डींग वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कोसळून मुंबईच्या घाटकोपर भागात मोठी दुर्घटना घडून काही निष्पाप नागरिकांना नाहक जीव गमावावा लागला होता.या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागांतील जाहिरातीच्या होर्डींग्जच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नेवासा तालुक्याच्या विविध भागांत लावण्यात आलेले बहुतांश होर्डींग्ज हे विनापरवाना असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.यातील अधिक धक्कादायक बाब म्हणजे या महाकाय होर्डींग्जचे नियमानुसार वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक असताना संबंधितांकडून त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हात ओले केल्यानंतर आपली जबाबदारी संपली, या आविर्भावात संबंधित होर्डींग्जचे मालक वारेमाप पैसा कमविण्यात मग्न असल्याचे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर नेवासा तालुका आम् आदमी पार्टीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन बेकायदेशीर होर्डींग्जवर कारवाई करण्याबरोबरच नियमाकुल मोजक्या होर्डींग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.मात्र तालुका प्रशासनाने ही बाब अद्यापही गांभीर्याने घेतल्याचे दिसून आलेले नाही.संबंधित होर्डींग्ज धारकांनी तालुका प्रशासनाचे तोंड बंद केल्यामुळेच व्यापक समाजहिताच्या मुद्द्यावर अक्षम्य असंवेदनशीलता दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नेवासा फाटा येथे महाकाय होर्डींग्ज उभारण्याची जणू स्पर्धाच सुरू असून कुठलाही विधिनिषेध न बाळगता जाहिरातबाजीच्या माध्यमातून पैसा कमावण्याचा गोरखधंदा तालुका प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असल्याने भविष्यात घाटकोपर प्रमाणे मोठ्या जीवित तसेच वित्तीय हानीची आशंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.

तीव्र आंदोलन करणार

घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रामुख्याने नेवासा फाटा येथील महाकाय जाहिरात होर्डींग्जच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आम् आदमी पार्टीने दोन महिन्यांपूर्वीच लेखी निवेदनाद्वारे तालुका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र दुर्दैवाने इतक्या ज्वलंत प्रश्नावर तालुका प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याने त्यांच्यातील असंवेदनशीलता स्पष्ट झाली आहे. त्यामुळे या प्रश्नाची तड लावण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने येत्या दि. 4 जुलै पासून नेवासा तहसिलसमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

ॲड.सादिक शिलेदार, तालुकाध्यक्ष, आम आदमी पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button