एम फील कृती समितीचे ५ जुलै २०२४ रोजी सहसंचालक कार्यालय उच्च शिक्षण नांदेड येथे धरणे आंदोलन…..
एम फील कृती समितीचे ५ जुलै २०२४ रोजी सहसंचालक कार्यालय उच्च शिक्षण नांदेड येथे धरणे आंदोलन…..
वसमत/प्रतिनिधी-आपल्या विविध मागण्यांसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत एम फील कृती समितीच्या वतीने ५ जुलै २०२४ रोजी सहसंचालक कार्यालय उच्च शिक्षण नांदेड येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंगोली परभणी नांदेड लातूर येथील एम फिल कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
14 जून 2006 च्या यूजीसीच्या अधिसूचनेनुसार प्राध्यापकांच्या भरतीसाठी व पदोन्नतीसाठी एम फिल ही पदवी स्तरावर अध्यापनासाठी शैक्षणिक पात्रता निर्धारित करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने 5 सप्टेंबर 2006 रोजी शासन निर्णय निर्गमित करून एम फिल पात्रता धारक प्राध्यापक अधिव्याख्याता पदावर नियुक्ती व पुढील कॅस CAS अंतर्गत पदोन्नतीसाठी पात्र राहतील असे स्पष्ट केले. त्यानुसार महाराष्ट्रात वरिष्ठ महाविद्यालयात एम फील शैक्षणिक पात्रता धारक प्राध्यापकांच्या नियुक्ती व पदोन्नती होत होत्या. तेव्हापासून १६ वर्ष पदोन्नती रीतसर चालू होती. परंतु माननीय विजय साबळे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी २७ जानेवारी २०२१ रोजी पत्र निर्गमित करून महाराष्ट्रातील पात्रता धारक प्राध्यापकांचे पदोन्नतीचे लाभ स्थगित केले.
त्यानंतर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील एम फिल पात्रता धारक संघर्ष समितीने सदरील प्रश्न सोडवण्यासाठी युजीसी कडे स्पष्टीकरण मागितले. त्यानुसार ५ सप्टेंबर २०२२ रोजी युजीसी ने पत्रनिर्मित करून स्पष्टीकरण दिले. ज्यानुसार एम फिल पात्रता धारक पूर्णवेळ कार्यरत असलेले प्राध्यापक कॅस अंतर्गत पदोन्नतीसाठी पात्र असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी माननीय अजित बाविस्कर उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी पत्र निर्गमित करून यूजीसीच्या पत्रामध्ये कसलाही उल्लेख नसताना एम फील पात्रता धारक प्राध्यापकांना नेट मधून सूट दिलेल्या यादीत नाव असावे अशी मनमानी व अन्यायकारक अट घालून अनेक प्राध्यापकांना पदोन्नतीच्या लाभापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले आहे. महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले एमफील पात्रताधारन केलेल्या प्राध्यापकांच्या पदोन्नती पूर्वत सुरू कराव्यात म्हणून माननीय सहसंचालक, संचालक व उच्च शिक्षण विभागातील उच्च पदस्थाधिकारी व माननीय मंत्री महोदय यांना विद्यापीठ विकास मंच, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ, महाराष्ट्र प्राध्यापकांच्या विविध संघटना व महाराष्ट्र एमफील कृती समिती यांच्याद्वारे सदरील प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी निवेदने देऊन व बैठका घेऊन विनंती केली. सकारात्मक निर्णय घेण्याचे वारंवार आश्वासन देऊनही सदरील प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला. यावर कळस म्हणजे नांदेड उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक श्री किरणकुमार बोंदर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २ डिसेंबर २०२३ व १३ डिसेंबर २०२३ रोजी कार्यालयीन पत्र निर्गमित करून महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाकडून कसलेही लिखित निर्देश नसताना पदोन्नती झालेल्या प्राध्यापकांचे वाढीव वेतन बंद केले आहे व पदोन्नती ही रोखल्या आहेत. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या १० मे २०१९ च्या शासन निर्णयानुसार प्राध्यापकांच्या पदोन्नतीचा लाभ हा पात्रता दिनांक ऐवजी मुलाखत दिनांक केल्यामुळे प्राध्यापकांचे मागील तीन वर्षापासून आर्थिक नुकसान होत आहे.
वारंवार विनंती करून हे शासन स्तरावरून सकारात्मक निर्णय होत नसल्यामुळे नाईलाजास्तव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत एम फिल कृती समितीच्या वतीने जवळपास ३०० ते ३५० प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन एम फील कृती समिती च्या वतीने अध्यक्ष डॉ. धनपाल चव्हाण यांनी केल्यानुसार मोठ्या संख्येने प्राध्यापक उपस्थित होऊन सदरील धरणे आंदोलन यशस्वी झाले. यावेळी कृती समितीच्या वतीने सहसंचालक, ऊच्च शिक्षण, नांदेड यांना निवेदन देण्यात आले.