उदगीर पंचायत समिती–जिल्हा परिषद निवडणूक 2026

उदगीर पंचायत समिती–जिल्हा परिषद निवडणूक 2026
दुपारी 1.30 वाजेपर्यंत 32.53 टक्के मतदान
उदगीर प्रतिनिधी — जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत उदगीर पंचायत समिती मतदारसंघात आज सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला दुपारपर्यंत चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
निवडणूक प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार दुपारी 1.30 वाजेपर्यंत एकूण 32.53 टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. यामध्ये पुरुष मतदारांचे मतदान प्रमाण 33.94 टक्के, तर महिला मतदारांचे मतदान 31.01 टक्के आहे. इतर प्रवर्गात अद्याप मतदान झालेले नाही.
सकाळी 9.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 5.49 इतकी होती, ती 11.30 वाजेपर्यंत 17.78 टक्क्यांवर पोहोचली असून दुपारच्या सत्रात त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. शहर व ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढताना दिसून येत असून पुढील सत्रात मतदानाचा टक्का आणखी वाढेल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात असून मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडत आहे. प्रत्येक दोन तासांनी मतदानाचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. उर्वरित मतदारांनीही निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.















































