अक्षरगुढी उभारून महात्मा फुले शाळेत विद्यार्थ्यांनी साजरा केला गुढीपाडवा

अक्षरगुढी उभारून महात्मा फुले शाळेत विद्यार्थ्यांनी साजरा केला गुढीपाडवा
कंधार (प्रतिनिधी) – निपुण महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मराठी वाचन, लेखन आणि गणिताच्या मूलभूत संकल्पना दृढ करण्यासाठी कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत अनोख्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला.
दिनांक २९ मार्च रोजी, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन “अक्षरगुढी” उभारली. या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मुळाक्षरे, बाराखडी आणि उजळणीचे सादरीकरण केले. यानंतर गुढीच्या प्रतिमेला रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
राज्य सरकारच्या निपुण महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी. एन. केंद्रे, सचिव चेतनभाऊ केंद्रे आणि माजी नगराध्यक्षा व संस्था संचालिका अनुसया चेतन केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे, तसेच शिक्षक उषा कागणे, आनंद आगलावे, चंद्रकला तेलंग, माणिक बोरकर यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषेत गुढीपाडवा साजरा केला आणि विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.