पूरग्रस्तांच्या मदतीला धावले AVOPA — अवघ्या 24 तासांत 100 कुटुंबांना किराणा किट

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले AVOPA — अवघ्या 24 तासांत 100 कुटुंबांना किराणा किट
उदगीर | प्रतिनिधी : ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे बोरगाव परिसरात आलेल्या पुरामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊन ते संकटात सापडले असताना, आर्य वैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशन (AVOPA) उदगीर संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
संस्थेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला दानशूर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवघ्या 24 तासांत आवश्यक निधी व साहित्य उपलब्ध करून दिले. त्यानंतर AVOPAच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी थेट बोरगाव गाठून 100 अत्यंत गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किराणा किट वाटप केले.
पूरस्थितीमुळे अन्नधान्य, पाणी व दैनंदिन गरजांच्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती. अशा वेळी मिळालेली AVOPAची ही मदत गावकऱ्यांसाठी दिलासा ठरली. या कार्याची ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली.
यावेळी सर्व दानशूर दाते, कार्यकर्ते व परिश्रम घेतलेल्या पदाधिकाऱ्यांचे AVOPA च्या वतीने आभार मानण्यात आले.