मानवतला महापारायण सोहळ्याची जय्यत तयारी
मानवतला महापारायण सोहळ्याची जय्यत तयारी
राज्यभरातून १५ हजार भाविकांची उपस्थिती
मानवत प्रतिनिधी
शहरातील संत श्री गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने रविवारी ता ५ होणाऱ्या श्रीगजानन विजय ग्रंथाच्या एक दिवसीय महापारायण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून एकाच दिवशी एकाच वेळेत राज्यभरातील १५ हजार भक्तगण सामुहिक पारायणास बसणार आहेत .
शहराबाहेर रिंग रोडवर श्री गजानन महाराजांचे मंदिर असून संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने वापी गुजरात येथील गजानन भक्त शशिकांतदादा पोकळे यांच्या मुळ संकल्पनेतून सदरील महापरायण सोहळा संपन्न होणार आहे .
शहरातील श्री गोरक्षण संस्थेच्या समोरील तब्बल ५२ एक्कर जागेची साफसफाई व सपाटीकरण झाले असून एकूण ५ एक्कर जागेत ३०० बाय ७०० चा भव्य मुख्य मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे . पार्किंग साठी ३० एक्कर जागा आरक्षित ठेवण्यात आली असून इतर जागेत बुक स्टॉल , चप्पल स्टँड , फिरते शोसचालय , स्वयंपाकघर , स्टोरेज रुम ची व्यवस्था केली आहे .
५ जानेवारीला सकाळी ८ वाजता श्री गजानन विजय ग्रंथाच्या मुख्य पारायणास सुरुवात होणार असून बडनेरा अमरावती येथील संध्या सुहास देशपांडे ( कुंभारीकर ) या मुख्य पारायण वाचक आहेत . दुपारी ४ च्या सुमारास महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . तब्बल ३० हजार भाविकांना महाप्रसाद वाटप केला जाणार आहे . पारायणास बसणारे १५ हजार भक्तासह उपस्थित ३ हजार सेवेकरी व उपस्थितांना प्रसादरूपी ३० हजार रुद्राक्ष वाटप केले जाणार आहे .
या महापारायण सोहळ्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी शहरातील सर्व मंगल कार्यालयासह परभणी , ढालेगाव व सिमुरगव्हान येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे .
कार्यक्रमासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद बांगड , स्वागताध्यक्ष आमदार राजेश विटेकर , कार्याध्यक्ष डॉ अंकुश लाड , पंकज आंबेगावकर , उपाध्यक्ष कल्याणराव शिंदे , ज्ञानेश्वर मोरे , सुरेश काबरा , प्रकाश बारहाते , कोषाध्यक्ष संतोष काबरा , सहकोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाहोटी , बालासाहेब बारहाते , सचिव अमोल गडम , सहसचिव दिनेश देशमुख , नितीन कमळू आदींनी केले आहे .