मानवतला शारदोत्सव व्याख्यानमालेस मोठा प्रतिसाद
मानवतला शारदोत्सव व्याख्यानमालेस मोठा प्रतिसाद
मानवत प्रतिनिधी : येथील शिक्षक- पालक संघ आयोजित शारदोत्सव व्याख्यानमाला 2024 अंतर्गत तीन पुष्प गुंफण्यात आले. या तीन दिवसीय व्याख्यानमालेस मोठा प्रतिसाद मिळाला .
येथील देवी मंदिर सभागृहात व्याख्यानमाला घेण्यात आली . 14 ऑक्टोबर 2024 रोजी श्री. अनुपजी शुक्ल सीए,- परभणी यांनी “राष्ट्र उभारणी आजच्या युगात” या विषयावर बोलताना सध्याच्या युगात पौराणिक, ऐतिहासिक व संगणक युगात युद्धाचे बदलते स्वरूप, छुपे शत्रू व आपली भूमिका ,काय असावी हे सांगताना इतिहासापासून प्रेरक प्रसंग व प्रेरक व्यक्तिमत्व वारंवार आबाल वृद्धांपुढे मांडून तेजस्वी व्यक्तिमत्व व तेजस्वी राष्ट्राची उभारणी करावी असे विशद केले. द्वितीय पुष्प 15 ऑक्टोबर 2024 या दिवशी डॉक्टर सौ .मंजुषा चौधरी, पाथरी यांनी “सामाजिक समरसता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर” या विषयावर बोलताना सावरकरांना समाज सुधारक नव्हे तर समाज क्रांतिकारक या भूमिकेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतित पावन मंदिर, अखिल हिंदू उपहारगृह ,अखिल भारतीय हिंदू महिला हळदीकुंकू तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती पंडित दीनानाथ मंगेशकर ,वि .स. खांडेकर, प्रबोधनकार ठाकरे यांना सोबत घेऊन ठिकठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात सहभोजनाचे आयोजन करून समाजातील जातींची विषम दरी कमी करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न केले .सप्तबंदी उठवण्यासाठी स्पर्श बंदीसाठी दलित वस्त्यांमध्ये वारंवार गोष्टींचे आयोजन, रोटीबंदीसाठी सहभोजनाचे आयोजन ,बेटी बंदीसाठी आंतरजातीय एकूण तेरा विवाह लावून दिले .तसेच व्यवसाय बंदीसाठी स्वतः अनेक व्यवसायांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतले. 16 ऑक्टोबर 2024 श्री. रावजी लुटे, परभणी यांनी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या विषयावर प्रकाश टाकताना प्रखर दुष्काळाच्या काळात भारतभर ठीक ठिकाणी घाट व मंदिराची उभारणी करण्यासाठी हजारो मजुरांना पोटापाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून काम दिले आणि संस्कृती संवर्धनही केले. हा सर्व खर्च त्यांनी राजकीय कोशातून न वापरता स्वतःच्या खाजगी मालमत्तेतून स्वतः व साधेपणाने जगून राष्ट्रकार्यासाठी वापरले. तसेच सैनिकांच्या विधवांना विनकाराचे प्रशिक्षण देऊन जगप्रसिद्ध माहेश्वरी साडीचे उत्पादन, वितरण व विक्री असे अनमोल कार्य केले. भिल्ल जातीच्या गुन्हेगार प्रवृत्तीकडे नाईलाजाने वळलेल्या ,पोटापाण्यासाठी लुटमार करणाऱ्या जमातीस संघटित करून त्यांना शिक्षा न करता आत्मसन्मानाने जगता यावे आणि त्यांच्यातील अंगभूत शौर्य व प्रामाणिकपणा या गुणांचा उपयोग करून मार्ग संरक्षण व चौकांची पहारीदारी दिली. एवढं सर्व असतानाही अत्यंत साध्वी जीवन स्वतः जगल्या” त्यामुळेच लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” केवळ आणि केवळ हेच नामा विधान सार्थ ठरते. मानवत येथील देवी मंदिर सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेस नगरातील विविध भागातील सुमारे 90 ते 100 सुजाण नागरिक नित्य उपस्थित होते. श्री. रुपेश जी देशपांडे ,सौ लता भरड आणि कीर्ती ताई कतृवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय व्याख्यानाचे सूत्रसंचालन केले देवी मंदिर समिती यांनी नि:शुल्क सभागृह उपलब्ध करून दिले. तसेच माननीय वक्त्यांना पसायदान ग्रंथ व आंब्याची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले. शिवराज सेवाभावी संस्थेचे संस्थापक श्री .आप्पाजी चिंचोलकर यांनी नि:शुल्क रोपे उपलब्ध करून दिली.