आतिषबाजीने वसमत शहर दुमदुमले….
आतिषबाजीने वसमत शहर दुमदुमले….
वसमत….. प्रतिनिधी……
दिनांक 12 आक्टोबर शनिवारी येथील जिल्हा परिषद मैदानावर रात्री रावण दहन कार्यक्रम मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. यावेळी करण्यात आलेल्या नेत्रदीपक आतिषबाजीने अवघे वसमत शहर दुमदुमले. डोळ्याचे पारणे फेडणारा हा दसरा सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हजारो नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवला.
सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सवात दहा दिवस दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुध्दा समिती तर्फे प्रदर्शनी सह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा समारोप रावण दहनाने संपन्न झाला. यावेळी मागील दहा दिवसात पार पडलेल्या शेती पिक स्पर्धा, शेती पशु स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, कबड्डी स्पर्धा तसेच यावर्षी भव्य शंकरपट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मागील वर्षी नवरात्रोत्सवात झालेल्या पावसाने नागरिकांचा हिरमोड झाला होता पण यावर्षी वरुणराजाच्या कृपेने संपुर्ण दहा दिवस नागरिकांना प्रदर्शनीसह विविध कार्यक्रमाचा यथेच्छ आनंद घेता आला. पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, विद्युत वितरण कंपनी, कृषी विभाग यांचे समितीला चांगले सहकार्य लाभले.
या रावण दहन कार्यक्रमासाठी शहरासह ग्रामीण भागातील आबालवृद्ध, बच्चे कंपनी, महिला व पुरुष यांची पन्नास हजार पेक्षा जास्त उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री राजु भैय्या नवघरे, माजी मंत्री श्री जयप्रकाश दांडेगावकर, डॉ क्यातमवार, गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पत्रकार, प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवाजी अडलिंगे यांनी केले तर सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री पोराजवार, श्री शिवदास बोड्डेवार यांनी समितीच्या वतीने आभार व्यक्त केले.