गजेंद्र मोक्ष-श्री. हत्ती बेट
गजेंद्र मोक्ष-श्री. हत्ती बेट
उदगीर तालुक्यातील देवर्जन पासून ५ अंतरावर हत्तीबेट नावाचं एक ठिकाण आहे. खूप मोठा पौराणिक संदर्भ घेवून हे ठिकाण पुन्हा नव्याने पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. हे ठिकाण म्हणजे खूप उंच असा डोंगर आहे.या डोंगरावर हत्तीच्या आकाराचे महाकाय दगड असून, हे दगड हत्तीच्या रंगाचे असल्यामुळे दूरवरून ते हत्तीसारखेच भासतात. परंतु एवढ्या एका कारणावरून या ठिकाणला हत्तीबेट म्हणत नाहीत, तर या पाठीमागे खूप प्राचीन अशी पौराणिक पार्श्वभूमी आहे.श्रीमद भागवत पुराणाच्या सातव्या स्कंदात वर्णन केलेली गजेंद्रमोक्षाची कथा अत्यंत प्राचीन काळी याठिकाणी घडली.ते पावनक्षेत्र म्हणजे हत्तीबेट होय.
भागवत पुराणात खूप विस्ताराने आलेली गजेंद्रमोक्षाची कथा थोडक्यात अशी. इंद्रधग्न नावाचा दक्षीणेकडील राजा प्राचीन काळी त्रिकुट पर्वत रांगेतील सुवर्ण शिखराच्या हत्तीबेट या शांत व प्रसन्न ठिकाणी तपस्या करण्यासाठी आला होता. विपुल व घनदाट वनश्री वनचरे यांच्या अस्तीत्वाने बहरून गेलेल्या अतिरम्य ठिकाणी राजाने तपस्येला प्रारंभ केला. कांही दिवस लोटल्यानंतर सप्तर्षी पैकी एक अगस्ती ऋषी या ठिकाणी आले अगस्तीचा प्रचंड लवाजमा, व शिष्यगणांचा गोतावळा यामुळे जराही विचलीत न होता राजा इंद्रधुग्नने आपली तपस्या अखंड ठेवली.अगस्तीना हा आपला उपमर्द वाटला आणि त्यांनी राजाला शाप दिला, ‘पुढील जन्मी हत्ती होऊन प्रायश्चित भोगशील.’ या शापवाणीने राजा भानावर आला. त्याने अगस्तीचे पाय धरले आणि उःशाप मागितला. यानंतर अगस्ती म्हणाले, भगवान विष्णुचा धावा केल्यानंतर ते तुला संकटमुक्त करतील. शापवाणीच्या अनुक्रमाने पुढील जन्मी राजा हत्तीच्या जन्मास गेला. महाकाय धूड असलेला हा गजेंद्र या भागातील जंगलात असंख्य हत्तीणी व हत्तीच्या पिलासह विहार करीत असे. त्याच्या गंडस्थळातून वाहणाऱ्या मदामुळे सारा परिसर मदमस्त होत असे.