सहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा उदगीरच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
सहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा उदगीरच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
उदगीर प्रतिनिधी : –सहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रु. दंड अशी शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ पी.डी. सुभेदार यांनी ठोठावली. याबाबतची थोडक्यात हकिकत अशी की, पिडीत सहा वर्षाची मुलगी व आरोपी अब्दुल मुखीद जैनोलाबेद्दीन शेख हे एका गल्लीत रहात होते. आरोपी हा पिडीत मुलीला खेळण्यासाठी मोबाईल देत असे. घटने दिवशी आरोपीने पिडीतीस खेळण्यासाठी मोबाईल दिला व त्यावेळी आरोपीने पिडीत मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला. सदरची बाब पिडीत बालीकेने तिचे आईस सांगितली असता पिडीतेच्या आईने उदगीर ग्रा. पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन आरोपीविरुध्द कलम ३७६ (अब), ३५४ भादवि तसेच कलम ४, ६, ८,१०, १२ बा.लै.अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद करुन गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी केला .व आरोपीविरुध्द दोषारोपपत्र उदगीरच्या न्यायालयात दाखल केले.
उदगीर येथील अति रिक्त जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने एकुण ०८ साक्षिदारांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच बचाव पक्षातर्फे एकुण ०४ साक्षिदार तपासण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या साक्षिदारांच्या साक्षिपुराव्यांवर व बचाव पक्षाच्या साक्षिदारांच्या उलट तपासणीवर व कागदपत्रावरती तसेच सहा. सरकारी वकील शिवकुमार गिरवलकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.डी. सुभेदार यांनी सदरील आरोपी अब्दुल मुखीद जैनोलाबेद्दीन शेख यास २० वर्षे सश्रम कारावास व विविध कलमान्वये एकत्रीत २५,०००/- रु. दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
सदरील प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून अॅड. शिवकुमार गिरवलकर यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी अक्रम शेख यांनी सहकार्य केले.