77 वर्षाची परंपरा लाभलेला पाळज येथील आगळा वेगळा गणेशोत्सव…
77 वर्षाची परंपरा लाभलेला पाळज येथील आगळा वेगळा गणेशोत्सव
***********
भोकर (उत्सव वार्ता- बी. आर.पांचाळ) भोकर तालुक्यातील महाराष्ट्र- तेलंगाना सीमेवर असलेल्या पाळज गावातील गणेश उत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे, या उत्सवाला 77 वर्षाची परंपरा लाभली असून प्रारंभी लाकडा पासून बनवलेली मूर्तीच आजही पूजन केल्या जाते त्या मूर्तीला सुंदर सजावट आकर्षक बनविण्यात आले असून10 दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो धार्मिक कार्यक्रम घेतले जातात भाविकांची अलोट गर्दी येथे उसळलेली असते सामाजिक एकता आणि धार्मिक परंपरा जपण्याचे हे प्रतीक असल्याने उत्सवाची लोकप्रियता दरवर्षीच वाढलेली दिसून येत आहे.
पाळज गावामध्ये 1947 साली लाल मातीचा गणपती करून बसविण्यात आला होता पूर्वीपासूनच गावामध्ये सुख शांती राहिलेली नव्हती रोगराई पसरलेली होती धन धान्याची भरभराट नव्हती सुख समाधान ही नव्हते त्यानंतर दुसऱ्या वर्षी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी निर्मल येथे जाऊन नाकेश्वर गुंडाजी या सुताराकडून लाकडाची मूर्ती बनवून आणून बसविली त्यानंतर मात्र गावाला सुख समाधान मिळाले गावात शांती नांदू लागली धन धान्याची भरभराट झाली गावातील रोगराई दूर झाली गाव आनंदाने नांदू लागले, तेव्हापासून गावकऱ्यांनी ठरवले की त्या मूर्तीचे विसर्जन करायचे नाही म्हणून तेव्हापासून सदर लाकडाची मूर्ती विसर्जन केली जात नाही, दरवर्षी गणेश उत्सवाच्या काळामध्येच त्या मूर्तीला बाहेर काढले जाते गणेश उत्सव झाल्यानंतर एका खोलीमध्ये सदर मूर्ती बंद करून ठेवतात त्यानंतर दुसऱ्या वर्षीच ती मूर्ती बाहेर काढून तिची पूजा केली जाते उत्सव काळामध्ये एक छोटी मूर्ती समोर बसवतात आणि त्याच मूर्तीचे विसर्जन केले जाते.
भव्य दिव्य मंदिर आणि आकर्षक मूर्ती
***********
2003 सालीच भव्य दिव्य मंदिराचे विस्तारीकरण करून बांधकाम करण्यात आले, सुंदर सजावट करण्यात आली, गणेश मूर्तीची देखील अत्यंत सुंदर अशी रंगरंगोटी करून शोभायमान मूर्ती करण्यात आली अतिशय आकर्षक अशी मूर्ती आणि मंदिरातील आतील सजावट भाविकाच्या मनामध्ये नक्कीच श्रद्धा निर्माण करून जाते, मंदिराचा भौतिक परिसर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा झाला असून चोहो बाजूनी सिमेंट रस्ते झालेले आहेत, सभा मंडप, दर्शन हॉल, सांस्कृतिक सभागृह, प्रसादालय, भक्तनिवास ,पिण्याचे शुद्ध पाणी, दररोज महाप्रसाद वाटण्याचवाटण्याची व्यवस्था, परिसरातील स्वच्छता अशा अनेक सुविधा भाविकांसाठी करण्यात आले आहेत, तेलंगाना महाराष्ट्र विदर्भ कर्नाटक या राज्यातील भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमत असते दरवर्षीच भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढत आहे, आलेल्या भाविकांची व्यवस्था व्हावी म्हणून मंदिर समितीच्या वतीने दर्शनाचे व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रांगेत दर्शन घेण्याची व्यवस्था सर्वांना महाप्रसाद मिळेल याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने केली जाते
सामाजिक एकता आणि धार्मिक परंपरेचे दर्शन
************
पाळज येथील गणेश उत्सव सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारा असून धार्मिक परंपरा देखील या ठिकाणी जपली जाते उत्सवाच्या काळामध्ये दहा दिवस गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात जे काम वाटून दिलेली आहे ती जबाबदारी घेऊन रात्रंदिवस पुरुष युवक महिला विद्यार्थी काम करीत असतात दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमात घेतले जातात, नामवंत कलाकारांना बोलावले जाते आरती पूजा देखील उत्साहाच्या वातावरणात दररोज केल्या जाते, येणाऱ्या भाविक भक्ताकडून मोठ्या प्रमाणावर अन्नदान, रोख रक्कम, सोने चांदी दिल्या जाते नवसाला पावणारा गणपती म्हणून पाळज येथील गणपतीची ख्याती सर्वत्र पसरली आहे.
दररोज 60 क्विंटल चा होतो महाप्रसाद
***********
पाळज येथे गणेश उत्सवाच्या काळात दररोज भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केल्या जाते 60 क्विंटल तांदुळाचा महाप्रसाद बनविला जातो हा महाप्रसाद बनविण्यासाठी गावातील मंडळीच सर्व कामे करतात प्रसाद बनविणे, भांडी धुणे स्वच्छता करणे प्रसाद वाटणे अशी कामे सर्व गावकरी मंडळी आनंदाने करतात दहा दिवस गावातील मंडळी पूर्ण मंदिराच्या सेवेसाठी कार्यरत असते म्हणूनच हा उत्सव सर्वांसाठी आनंददायी उत्साह व सामाजिक एकतेचा धार्मिक परंपरेचा बनला आहे