वझुर बु. ला मुक्कामी बस पाण्यात वाहली
वझुर बु. ला मुक्कामी बस पाण्यात वाहली
मानवत तालुक्यात पावसाचा कहर
पाथरी पोखर्णी रोड बंद
मानवत तालुका प्रतिनिधी
३६ तासानंतरही मानवत तालुक्यात पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून तालुक्यातील वझुर बु येथे नदीला अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात एसटी महामंडळाची बसस्थानकावर मुक्कामी उभी असलेली बस सोमवारी ता २ पहाटे सव्वा चार च्या सुमारास वाहत जाऊन विजेच्या खांबाला जाऊन अडकली आहे .
मानवत शहरासह तालुक्यात शनिवार ता ३१ मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे . त्यामुळे नदी , नाले व ओढे तुडुंब भरून वाहत आहे . पाथरी आगाराची मानवत ते वझुर बु ही एसटी महामंडळाची बस ( क्रमांक एम एच २० बी एल ०१७८ ) ही रोजच्या प्रमाणे वझुर बु येथे रविवारी ता १ सायंकाळी मुक्कामी होती . बसचे चालक सुदाम दहे व वाहक शिवाजी देशमुख यांनी बस रोजच्या ठिकाणी लावून ग्रामपंचायतच्या कार्यालयात रात्री आराम केला . रात्री जोरदार पाऊस झाल्याने वझुर बु येथील नदीस मोठा पूर आला . पहाटे ४ च्या सुमारास मुक्कामी उभी असलेली बस ही पुराच्या पाण्यात वाहून जाऊन एका विजेच्या खांबाला अडकून पडली आहे .
दरम्यान पोलीस व महसूल प्रशासनाचे व एस टी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून एसटी ला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पाथरी पोखर्णी मार्ग बंद
मानवत तालुक्यातील रामटेकळी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने पाथरी ते पोखर्णी हा राज्यमार्ग बंद झाला असून वाहतूक ठप्प झाली आहे . दरम्यान या पावसाने शहरातील बांगड प्लॉट भागातील अनेक घरात नाल्याच्या पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली . पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतातील कापूस व सोयाबीन ची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .