मेकॉलेने समृद्ध ज्ञानपरंपरेचे वाटोळे केले – प्रभाकर साळेगावकर
मेकॉलेने समृद्ध ज्ञानपरंपरेचे वाटोळे केले – प्रभाकर साळेगावकर
मानवत : आपल्या देशात समृद्ध ज्ञानपरंपरा असणारी शिक्षणव्यवस्था होती. मात्र ब्रिटीशांच्या काळात मेकॉलेने या शिक्षणव्यवस्थेचे वाटोळे केले असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर यांनी केले. येथील पांडे कॉमर्स अकडमीच्या वतीने रविवार, दि.२५ रोजी आयोजित गुणगौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अंकुश लाड, पंकज आंबेगावकर, भूषण चांडक, नितीन लोहट, प्रा. अरविंद घारे, अनंत गोलाईत अॅड.अनिरुद्ध पांडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना साळेगावकर यांनी सांगितले की, गुरुकुल शिक्षण पद्धती ही आपल्या देशाचे बलस्थान होती. त्यामुळे मेकॉलेने ही शिक्षण व्यवस्था मोडीत काढली. देशात लागू झालेले नवे शैक्षणिक धोरण अतिशय उपयुक्त आहे. यावेळी डॉ. अंकुश लाड, प्रा. नितीन लोहट, आकांक्षा मगर, प्रवीण बुलंगे यानी मनोगत व्यक्त केले.
विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव
अकादमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यासह समाजाच्या विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या गुणवंतांचाही गौरव केला. प्रा. नितीन लोहट (शैक्षणिक), भूषण चांडक (किसान कृपा दुध डेअरी), गजानन शिंदे (सामाजिक-आर्थिक), श्रीनिवास कुमावत, आर्य वैश्य महिला मंडळ, विजय भदर्गे, अशोक घरबुडवे यांचा सत्कार करण्यात आला.
कवितांना मिळाली भरभरून दाद
प्रभाकर साळेगावकर यांनी यावेळी विविध कविता सादर केल्या. राजकीय विडंबनला विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली. तसेच कवितेच्या आई-वडिलांना न दुखावण्याचे आवाहनाने वातावरण गहिवरून गेले. देशभक्तीपर रचनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.अनिरुद्ध पांडे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल किरवे, रोहिणी दहे यानी तर आभार पल्लवी कदम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय साळवे, भागवत हरणे, प्रेम पवार, अर्जुन ठेंगे, शिवं लेंगुळे,विशाल बुलंगे, रोहित कोक्कर, बालाजी जाधव,महेश गिरी यांनी परिश्रम घेतले.