समाधान विकत घेता येत नाही ― श्री जयप्रकाशजी दांडेगावकर
समाधान विकत घेता येत नाही ― श्री जयप्रकाशजी दांडेगावकर
वसमत /प्रतिनिधी. निष्ठेने केलेले कार्यच आपल्याला समाधान देऊ शकते. समाधान हे कुठेही विकत मिळत नाही त्यामुळे मिळालेल्या संधीचा व पदाचा सन्मान राखत निष्ठेने काम करीत आहे व त्याचेच फळ म्हणून आज जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे, ही माझ्या दृष्टीने अतिशय समाधान देणारी गोष्ट आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी सहकार राज्यमंत्री श्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात आज दिनांक 16/7/2024 रोज मंगळवारी ग्रंथालय सभागृहात, बहिर्जी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांना दि शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन, नवी दिल्ली या संस्थेचा देशपातळीवरील लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेती, शिक्षण आणि सहकार या क्षेत्रात काम करत असताना संस्थेचा व सभासदांचा विकास व प्रगती कशी होईल याकडे माझे लक्ष असते व त्याद्रष्टीने मी नियोजन करीत असतो असे ते म्हणाले. खरेतर वसमत वासीयांनी मला संधी दिली, मोठे केले म्हणून मी देशपातळीवर काम करु शकलो त्यामुळे हा फक्त माझा नव्हे तर समस्त वसमत वासीयांचा सन्मान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ मा. मा. जाधव यांनी केले. तर संस्थेचे सचिव श्री पंडितरावजी देशमुख सर यांनी आपल्या मनोगतातुन श्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांचा जीवनप्रवास मांडला. संस्थेचे संचालक श्री शंकरराव कर्हाळे यांनी येणाऱ्या काळात वसमत साठी मोठी जबाबदारी स्वीकारावी अशी विनंती केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे उपाध्यक्ष श्री मुंजाजीराव जाधव साहेब यांनी श्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक अँड. श्री रामचंद्रजी बागल, श्री नितीन महागावकर, श्री राम झुंझुल्डे, श्री विनोद झंवर, अँड. श्री चिंतामणराव देशमुख, श्री जयराम जाधव यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, बहिर्जी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, पत्रकार, गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी, महिला, पुरुष मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ शारदा कदम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा डॉ अनिल मुगुटकर यांनी केले.