मानवतरोड रेल्वेस्थानकावर १२ कोटींची विकासकामे जोमा पण मूलभूत सुविधाभावी प्रवाशी झाले त्रस्त
मानवतरोड रेल्वेस्थानकावर १२ कोटींची विकासकामे जोमा पण मूलभूत सुविधाभावी प्रवाशी झाले त्रस्त
मानवत सौ ममता चिद्रवार – मानवत तालुक्यातील मानवतरोड या रेल्वे स्थानकाचा केंद्र शासनाच्या अमृतभारत स्टेशन विकास योजनेअंतर्गत समावेश करण्यात आल्यानंतर गेल्या ३ महिन्यापासून विकास कामाने वेग घेतला आहे . या योजनेअंतर्गत तब्बल ११ कोटी ८३ लाख रुपयांची विकासकामे सुरू झाली असली तरी इतर मूलभूत सुविधाअभावी व अनेक एक्सप्रेस गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सोसावा लागत आहे .
मानवत, पाथरी, सोनपेठ व माजलगाव या चार तालुक्यातील हजारो प्रवाशांसाठी सोयीचे असलेल्या मानवत रोड रेल्वे स्थानकात अमृतभारत स्टेशन योजनेअंतर्गत विकासकामाचा शुभारंभ २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हीसी द्वारे करण्यात आला होता . या योजनेअंतर्गत देशभरातील एकूण ५५४ रेल्वेस्थानकात मानवतरोड या स्थानकाचा समावेश होता . यासाठी तब्बल ११ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी वापरला जात आहे . यामध्ये प्लॅटफॉर्म क्रंमाक एक वर नवीन दोन प्रवाशी निवारा शेड, प्लॅटफॉर्म क्रंमाक दोनवर एका शेडचे अशा एकूण तीन नवीन शेड उभारण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर नवीन इमारत तयार केली जात असून याबरोबर वयोवृद्ध प्रवाशांना अडचण येऊ नये म्हणून दादराच्या शेजारी लिफ्टचे कामही सुरू करण्यात आले आहे . तसेच दोन्ही प्लॅटफॉर्मवर नवीन शेडची उभारणी झाल्यानंतर कोच डिस्प्ले बसविले जाणार असल्याने यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार असल्याची माहिती परभणीचे स्टेशन अधीक्षक अजितकुमार यांनी दै पुढारीशी बोलतांना दिली .
♦️ प्रवाशांना दिलासा मिळणार
मानवत तालुक्यातील मानवत रेल्वे स्थानकापासून पाथरी १४ कि मी , सोनपेठ ३६ कि मी, माजलगाव ४० किमी व मानवत ७ कि मी अंतरावर आहे . या चार ही तालुक्यातील हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यासाठी मानवत रोड स्थानकाचा उपयोग करतात. या स्थानकावरून मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर , नांदेड हैदराबाद , पुणे या शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये सर्वसामन्यासह बहुतांश करून व्यापारी व राजकीय पदाधिकारी यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. तसेच सण उत्सवाच्या काळात इतर प्रवाशांची ही संख्या लक्षणीय असते. यामध्ये वृद्ध महिला लहान बालके यांचाही समावेश असतो. हजारो प्रवासी या स्थानकावरून ये-जा करत असतात मात्र या स्थानकात प्रवशाकरीता दोन्ही प्लॅटफॉर्मवर नवीन शेड , कोच डिस्प्ले , लिफ्ट व नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
♦️ अन्य सुविधांची वानवा
मानवतरोड येथील रेल्वे स्थानकावर केंद्र शासनाच्या अमृत महोत्सव विकास योजनेअंतर्गत १२ कोटी रुपये खर्चून विकास कामे जरी सुरू झाली असली तरी ईतर असुविधेमुळे प्रवाशांना मोठया गैरसोयीचा सामना गेल्या कित्येक वर्षांपासून करावा लागत आहे . रेल्वेस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नाही , वेटिंग हॉल ला नेहमीच कुलूप असते , शौचालय असूनही ते काटे टाकून बंद आहेत, स्थानकावर स्वच्छतेचे तीन तेरा नेहमीचेच आहे . या सर्व गोष्टींमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . या सर्व गोष्टींचा विचार विकास कामासोबत झाला पाहिजे .
♦️ एक्सप्रेस गाड्या सुसाट
चार तालुक्यातील प्रवाशांसाठी एकमेव असलेल्या या स्थानकावर राजकीय इच्छाशक्ती अभावी अनेक एक्सप्रेस गाड्यांना थांबाच नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . नांदेड ते पुणे , सचखंड , व मुंबई हुन नांदेडला जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस या मुख्य गाड्यासह साप्ताहिक धावणाऱ्या सर्व गाड्या या स्थानकावर थांबणे गरजेचे आहे . तसेच संत साईबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या पाथरी येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी देशातील विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांना उतरण्यासाठी हे स्टेशन जवळचे आहे . यामुळे या स्थानकावर सर्व एक्सप्रेस गाड्यासह साप्ताहिक धावणाऱ्या गाड्याही थांबणे जरूरी आहे .