हर घर तिरंगा अभियान न राबविणाऱ्या महाविद्यालयास शिक्षण विभागाची कारणे दाखवा नोटीस
हर घर तिरंगा अभियान न राबविणाऱ्या महाविद्यालयास शिक्षण विभागाची कारणे दाखवा नोटीस
मानवत / प्रतिनिधी येथील पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या के के एम महाविद्यालयात हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम व १३ ऑगस्ट १४ ऑगस्ट रोजी चा झेंडावंदन हे अभियान न राबवल्यामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस प्राचार्यांना देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनाने हर घर तिरंगा हे अभियान शासनाच्या प्रत्येक कार्यालयात तसेच शिक्षण संस्था मध्ये राबविण्याचे आदेशित केले होते. पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या के के एम महाविद्यालयास मात्र हर घर तिरंगा या कार्यक्रमाचे वावडे असल्याचे दिसून आले. त्यांनी ९ ऑगस्ट पासून ते १५ऑगस्ट पर्यंत शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कोणताही कार्यक्रम महाविद्यालयांत घेतला नसल्याची गंभीर बाब आढळून आली आहे. त्याच बरोबर १३ व १४ ऑगस्ट रोजी जो झेंडावंदन करायचा होता तो देखील झेंडावंदन के के एम महाविद्यालयात केला नसल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. हा सर्व प्रकार पंचायत समितीच्या शिक्षण विभागास कळल्यानंतर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांनी तात्काळ के के एम महाविद्यालयाच्या प्राचार्याला कारणे दाखवा नोटीस बजावली असून २४ तासांमध्ये याचा स्वयंस्पष्ट अहवाल दाखल करण्याबाबतही आदेशित केले आहे. आता या प्रकरणात के के महाविद्यालय आपला खुलासा कोणत्या देऊन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो हे पहावे लागेल.
अशी आहे शिक्षण विभागाची कारणे दाखवा नोटीस
पंचायत समिती च्या शिक्षण विभागाने के के एम महाविद्यालयास दिलेल्या कारणे दाखवा नोटीस मध्ये असे नमूद केले कि जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती जागृत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतीकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्या साठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी जनमानसात तेवत राहण्याच्या उद्देशाने दिनांक ९ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घरो घरी तिरंगा उपक्रमातंर्गत विविध उपक्रम राबविण्याच्या सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या तिनही दिवशी परभणी जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्वमाध्यमाच्या प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी शाळेत झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे आयोजित करावा अशा सुचना निर्गमित करण्यात आल्या आहे.परंतु प्राप्त माहिती नूसार के के एम महाविद्यालयात दिनांक ९ ऑगस्ट २०२४ ते १४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत संदर्भीय पत्रात सुचविलेले कोणतेही उपक्रम राबविण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे दिनांक १३ ऑगस्ट व १४ ऑगस्ट २०२४ या दोन दिवशी महाविद्यालयात झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम ही घेण्यात आला नाही. त्यामुळे आपले महाविद्यालयातील विद्यार्थी सदरील उपक्रमापासून वंचित राहिले.करीता शासनाचे निर्देश प्राप्त असून ही राष्ट्रीय भावना विकसित करणे साठी सुचविण्यात आलेले उपक्रम महाविद्यालयात न राबविव राष्ट्रध्वज फडकविण्याचा कार्यक्रम का घेण्यात आला नाही. या बाबत आपला खुलासा सबळ पुराव्यासह दोन प्रतीत चोविस तासाचे आत गटशिक्षण अधिकारी यांचे कडे सादर करावा.सदरील बाब गंभिर आहे. करीता आपला स्वयंस्पष्ट खुलास विहित मुदतीत सादर करावा खुलासा विहित मुदतीत सादर न केल्यआपणास कांहीही म्हणावयाचे नाही असे गृहीत धरुन महाराष्ट्र जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील तरतूदी व इतर तरतूदी नूसार गैरशिस्तीचे गैरवर्तन केले बाबत मा. शिक्षणाधिकारी (मा.) जि.प. परभणी यांचे मार्फत मा. शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांचेकडे अहवाल सादर करण्यात येइल याची नोंद घ्यावी अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस के के एम महाविद्यालयास देण्यात आली आहे.