हत्तीबेट पर्यटनस्थळाला यात्रेचे स्वरूप; पर्यटकसंख्येत विक्रमी वाढ

हत्तीबेट पर्यटनस्थळाला यात्रेचे स्वरूप; पर्यटकसंख्येत विक्रमी वाढ
उदगीर | प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात वसलेले ऐतिहासिक आणि निसर्गरम्य हत्तीबेट पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. शाळा-महाविद्यालयांच्या सहलींचा हंगाम सुरू झाल्याने येथे पर्यटकांची संख्या तिपटीने वाढली आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वामुळे हत्तीबेटाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

हत्तीबेट – निसर्ग, इतिहास आणि श्रद्धेचे मिलन
हत्तीबेट हा केवळ निसर्गरम्य डोंगर नसून, ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. येथे पुरातन स्थापत्यशैलीचे दर्शन घडवणाऱ्या गुहा आणि लेण्या आहेत. हिरवीगार वनश्री, खेळणी क्षेत्र आणि सुंदर परिसर यामुळे पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी हे पसंतीचे ठिकाण ठरत आहे.

धार्मिक महत्त्व आणि आध्यात्मिक आकर्षण
हत्तीबेटावर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेला डोंगर आहे. तसेच, येथे सद्गुरू गंगाराम बुवा महाराज यांची संजीवन समाधी, श्री दत्त मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, बालाजी मंदिर आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिर असल्यामुळे भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
स्वातंत्र्यलढ्याचा ऐतिहासिक साक्षीदार
हत्तीबेट फक्त धार्मिक स्थळ नसून हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या महत्त्वाच्या लढायांचा साक्षीदार आहे. निजामाविरुद्धच्या लढ्यात किसान दलाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी येथे पराक्रम गाजवला होता, आणि विजय मिळवला होता. त्यामुळे हा अजिंक्य डोंगर स्वातंत्र्याच्या लढ्याचा जिवंत साक्षीदार आहे.
हत्तीबेट – मराठवाड्याचे ‘मिनी माथेरान’
राज्य शासनाने हत्तीबेटाला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या पुढाकाराने ७ कोटी रुपयांच्या पर्यटन विकासकामांना गती मिळाली आहे. वन विभागानेही उद्यान विकासाचे काम सुरू केले असून, त्यामुळे हत्तीबेटाला ‘मराठवाड्याचे मिनी माथेरान’ अशी ओळख मिळाली आहे.
पर्यटन विकासासाठी निधीची गरज
१६ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हत्तीबेट पर्यटन विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, अद्याप हा निधी मिळालेला नाही. हा निधी लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी हत्तीबेट पर्यटन विकास समितीने माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्याकडे केली आहे.
हत्तीबेट – महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर चमकणारे नाव!
योग्य निधी आणि नियोजन झाल्यास हत्तीबेट हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळ बनू शकते. येथील नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक महत्त्व पाहता, भविष्यात हत्तीबेट आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येऊ शकते.














































