लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न….
लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न….
(वसमत प्रतिनिधी)-एका शानदार कार्यक्रमात वसमत येथे लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न झाला.
दिनांक 24/6/2024 रोज सोमवारी येथील कन्हैया हाॅटेल मध्ये आयोजित या पदग्रहण सोहळ्यासाठी संभाजीनगर येथील लायन सुनिल देसरडा यांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांना पद व जबाबदारीची शपथ दिली. लायन्स क्लब ही एक जागतिक पातळीवर समाजसेवा करणारी संघटना असुन वसमत शहर या जागतिक संघटनेसोबत जोडले गेले आहे ही वसमतकरांच्या द्रष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याचे यावेळी मार्गदर्शन करताना लायन सुनिल देसरडा यांनी सांगितले.
जलसंवर्धन व जलसंधारण यासारख्या कामांची आज अतिशय गरज असुन शासनासोबत लायन्स क्लब सारख्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून याबाबत खुप मोठे काम करण्याची संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे श्री अविनाश गोहाड यांनी यावेळी उपस्थितांना केले. समाजासाठी काय करु शकतो हे अनेक उदाहरणाद्वारे त्यांनी स्पष्ट केले. समाज ही ईश्वराची निर्मिती आहे त्यामुळे समाज सेवा म्हणजे ईश्वर सेवा असे समजुन आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आपल्या भाषणाने श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून वसमतचे उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खल्लाळ व पोलीस निरीक्षक श्री कुंदनकुमार वाघमारे यांनी आपल्या भाषणातुन लायन्स क्लबच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी परभणी येथील लायन्स क्लबचे पदाधिकारी व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला असे प्रसिद्ध सी. ए. श्री शंकर गुजराथी, श्री प्रदीप गोलेच्छा, श्री सुनिल मुथा उपस्थित होते. वसमत लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर मारोती क्यातमवार यांची एकमताने निवड करण्यात आली.
वैद्यकीय व्यावसायिक असल्याने सामाजिक समस्यांची मला जाणीव आहे त्यामुळे लायन्स क्लबच्या माध्यमातून या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ध्वजवंदना व पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्ष लायन डॉ अनिल मुगुटकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वगेवार सर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सेलुकर यांनी केले. या कार्यक्रमात शहरातील गरीब गरजवंत विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे व शालेय साहित्याचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी शहरातील डॉक्टर, वकील, व्यापारी, पत्रकार, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.