मानवत येथील तपोनुष्ठान सोहळ्यातून सद्गुरू श्री सिद्धचैतन्य महाराजांचे तरुण पिढीसाठी आशिर्वचन
मानवत येथील तपोनुष्ठान सोहळ्यातून सद्गुरू श्री सिद्धचैतन्य महाराजांचे तरुण पिढीसाठी आशिर्वचन
मानवत तालुका प्रतिनिधी
परमपूज्य 108 वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या दिव्य सानिध्यात श्री अमरेश्वर मंदिर मानवत येथे सुरू असलेल्या श्रावण मास तपोनुष्ठान व शिव दीक्षा सोहळ्यात गुरुवर्य यांनी हिंदू धर्म जनजागृती व तरुण पिढीला उद्देशून केलेल्या आशीर्वचनात सांगताना म्हणाले तरुणांनी धर्माचे आचरण पालन करावे. जग बदलत आहे व धर्माची बंधने तरुणांना नकोशी झाली आहेत. चार वाकच्या तत्वानुसार खा- प्या मजा करा याकडे तरुणाईचे लक्ष वाढले असून यातून नैराश्य व ताण तणाव वाढत आहे व कमी वयात अनेक आजारांना तोड द्यावे लागत आहे. चुकीचे अनुकूलन व मिथ्या गोष्टींची धरणा आजचा तरुण करताना दिसत आहे. देशभक्तांच्या त्यागाचे व संतांच्या चरित्राचे आजच्या तरुणांना दुर्लक्ष झाले आहे. सोशल मीडियाचा अतिवापर पब्जी व इतर गेम मुळे तरुणाई स्वतःला संपवत आहे.
ही सर्व साधने तरुणांना भटकविण्याचे काम करत आहेत. मन्मथ माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज,स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे नवतरुणांना धर्म धारण करण्याची गरज आहे. इतिहासात नवतरुणांनी आपल्या भूमीसाठी आपले रक्त सांडले. त्यावेळी त्यांचा त्याग ही धर्मासाठी फॅशन होती. आपले अनमोल जीवन फॅशनच्या नावाखाली वाया घालू नका. जीवन अनमोल आहे प्रत्येक अवयव अनमोल आहे. त्यामुळे शरीराची काळजी घ्या देशासाठी व धर्मासाठी स्वतःचे आचरण ठेवा. एक वेळा जेवण करणारा योगी, दोन वेळा जेवण करणारा भोगी, तीन वेळा जेवण करणारा रोगी व अल्प आहारी शिवयोगी. संतांनी ही परंपरा अवलंबिली. मर्यादा प्रत्येक गोष्टीला औषधाचे काम करते. पाश्चात्य देश आपले अनुकरण करत आहेत. आपली भूमी, आपली परंपरा, आपले संस्कार पूजनी आहेत. संत समाजाला सोप्या भाषेत धर्म समजावून सांगतात. आपण कोण आपले कर्तव्य काय याचा विचार करण्याची गरज आहे आणि हे विचार संतांच्या सद्गुरूंच्या सानिध्यात तयार होतात. “आपुला आपण करावा विचार, करावया पार भवसिंधु..”संत कुठल्याही कुटुंबात, धर्मात जन्माला आले तरी ते या धर्माच्या कितीतरी वर पोहोचलेले असतात. अखिल प्राणीमात्राला सन्मार्ग मिळावा यासाठी प्रेरित करतात धर्माचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. धर्माचे आचरण केले तर धर्म वाढेल नसता तो कधी लुप्त होईल हे समजणारही नाही. मन्मथ माऊलींनी सोळाव्या शतकात धर्मजागविण्याचे काम केले. “निजू नका जागा जागा, स्व-धर्माने वागा”. “धर्म तो कुळीचा जाणिजे..” सर्व जाती वेगवेगळ्या असल्या तरी हिंदू धर्माचा धागा एक आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो… असा महान संदेश देत सर्वांना सामावून घेतो, कोणाचाही विरोध करत नाही, आपले तत्व सोडत नाही तो वीरशैव. आपण आपल्यात भांडत राहिलो तर समाप्त होऊ. एका विचारात राहिलो तर शाश्वत राहू. तरुणांनी या विचारधारेत येऊन आपल्या कुळाचा जातीचा व धर्माचा उद्धार करायला हवा असा महान संदेश सद्गुरु श्री सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांनी आपल्या प्रवचनातून दिला.