मानवत तालुक्यात पावसाचे थैमान
मानवत तालुक्यात पावसाचे थैमान
ओढ्याच्या पुरात १ महिला बेपत्ता तर १ सुखरूप
मानवत तालुका प्रतिनिधी – मानवत शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारी ता १० दुपारी ४ च्या सुमारास तब्बल २ तास पावसाने थैमान घातले . या अचानक पडलेल्या मोठ्या पावसामुळे ओढा ओलांडून घराकडे जाणाऱ्या मानोली येथील दोन शेतकरी महिला पुरात वाहून गेल्या . यापैकी १ महिला झाडाला अडकल्याने सापडली असून दुसरी महिला बेपत्ता झाली असून तिचा शोध घेतला जात आहे .
सुनीता धुराजी लव्हाळे वय ४० असे पुरात वाहून गेलेल्या महिलेचे नाव असून रंजना भास्कर सुरवसे वय ४२ असे सापडलेल्या महिलेचे नाव आहे . सध्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने कापूस पेरणीसाठी सरकी लावण्यासाठी त्या सोमवारी ता १० शेतात गेल्या होत्या . दुपारी पावणेचार च्या सुमारास अचानकपणे जोरदार पावसास सुरुवात झाल्याने या दोन महिलांसह इतरांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला . गावाच्या पाठीमागील ओड्यातून त्या जात असतांना अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने सदरील दोन महिला पाण्यात पोहता येत नसल्याने वाहून जाऊ लागल्या . यापैकी रंजना सुरवसे या एका झाडाला अडकल्याने तब्बल एक तासाने सोबतच्या ग्रामस्थांनी त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले . त्यांच्यावर येथिल एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती हॉस्पिटलच्या वतीने कुलदीप दगडू यांनी दिली .
दरम्यान पुरात वाहून गेलेली महिला सुनीता लव्हाळे यांचा शोध ग्रामस्थासह महसूल प्रशासनाची टीम घेत असून तहसीलदार पांडुरंग माचेवाड घटनास्थळी ठाण मांडून आहेत .
सोमवारी ता १० झालेल्या या पावसाने शहरातील वेशीतला मारोती मंदिर परिसरात असलेल्या नाल्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते . यामुळे तब्बल तीन तास गावात जाणारा रस्ता बंद होता .