भोकर शहरात खाजगी ट्रॅव्हल्सला मुख्य चौकामध्ये थांबा: एस.टी.बसचा थांबा मात्र हटविला: वाहतुकीची कोंडी कायम

भोकर शहरात खाजगी ट्रॅव्हल्सला मुख्य चौकामध्ये थांबा: एस.टी.बसचा थांबा मात्र हटविला: वाहतुकीची कोंडी कायम
***********
एस.टी.चा थांबा बदलल्याने प्रवाशांची होते गैरसोय
**********
भोकर (तालुका प्रतिनिधी) शहरात गेली अनेक दिवसापासून वाहतुकीची कोंडी कायम आहे, खाजगी वाहनांच्या थांब्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून गंभीर बनत चाललेल्या समस्येवर मार्ग काढावा अशी नागरिकांची मागणी होती, या मागणीचा आधार घेऊन अधिकाऱ्यांनी वेगळाच नियम सुरू केला असून एस.टी बसचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये महत्त्वाचा थांबा असताना तो हटविण्यात आला आणि त्या ठिकाणी खाजगी ट्रॅव्हल्सला मोक्याची जागा देण्यात आली, शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या महामंडळाच्या एसटी बसला दुसरीकडे थांबा आणि खाजगी ट्रॅव्हल्स मात्र मोक्याच्या ठिकाणी थांबत असल्याने प्रशासनाच्या चुकीच्या नियमाबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
भोकर शहरातील वाहतूक व्यवस्थेची कोंडी गेली अनेक दिवसापासून आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बिनधास्तपणे नियमबाह्य खाजगी वाहने ट्रॅव्हल्स जीप, ऑटो थांबून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात, दुकानदारांनी आपल्या दुकानातील सामान समोर ठेवून मोठ्या प्रमाणावर जागा व्यापून घेतली, हॉटेल चालकांनी सुद्धा समोर टेबल खुर्च्या लावून जागा व्यापून घेतल्याने वाहतुकीसाठी जागा शिल्लकच राहिली नाही, खाजगी वाहने रोडवरच लावल्या जातात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, महिलांना वाहतूक समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे शाहू विद्यालयातील 5 हजार विद्यार्थ्यांनी तीन वर्षापूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांना वाहतूक समस्या बाबत निवेदन दिले होते त्यानंतर शाहूचे मुख्याध्यापक संजय सावंत यांनी उपोषण देखील केले होते मात्र वाहतूक समस्या काही मिटलीच नाही अतिक्रमण देखील वाढत असल्यामुळे शहरामधून पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,पोलीस निरीक्षक, न.प.चे मुख्याधिकारी यांना देखील पत्रकार व नागरिकांनी वाहतूक समस्येबाबत अवगत करून मार्ग काढावा असे सांगितले होते
एस.टी.चा थांबा बदलला: खाजगी ट्रॅव्हल्सला मोक्याची जागा
*******
भोकर शहरातील वाहतूक समस्या मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील खाजगी वाहनांना इतरत्र थांबा देऊन चौकातील अतिक्रमण हटवून एस.टी बससाठी मोक्याची जागा द्यायला हवी होती मात्र तसे न करता एस.टी बसचा थांबा त्या ठिकाणाहून बदलला आणि जुन्या एस.बी.आय बँकेसमोर एस.टी थांबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या त्या ठिकाणी सुद्धा दुकानदारांचे अतिक्रमणच आहे तिथे सुद्धा प्रवाशांना उतरता येत नाही. खाजगी ट्रॅव्हल्स ची जागा मात्र बदलली नाही उलट खाजगी ट्रॅव्हल्स जीप यांना मोक्याची मोठी जागा देण्यात आली त्यांना व्यवस्थित थांबण्यासाठी व्यवस्था करण्यात आली त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे नियमबाह्य चालणाऱ्या खाजगी वाहनांना मात्र एक प्रकारे संरक्षणच देण्यात आले आहे.
एस.टी कडून शासनाला महसूल मिळतो, खाजगी ट्रॅव्हल्स काय देतात?
********
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हा शासनाचा अंगीकृत व्यवसाय आहे एस.टी.च्या उत्पन्नातून शासनाला महसूल मिळतो भोकर शहरात खाजगी ट्रॅव्हल्स जीप ऑटो नियमबाह्य चालतात, वाहतुकीचे नियम तोडतात, रस्त्यात वाहने उभी करून अडथळा निर्माण करतात, नियम बाह्य प्रवासी भरतात, अनेक वेळा अपघात देखील होतात भोकर मध्ये अशा वाहतुकीला संरक्षण देण्यात येत आहे आणि शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या एसटीला अधिकृत वाहतुकीला दुसरीकडे थांबा देऊन उत्पन्न घटविल्या जात आहे, खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचाच हा प्रकार आहे, मोक्याची जागा खाजगी ट्रॅव्हल्सला आणि दुसरीकडे एसटीला दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात येत असल्याने प्रशासनाच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे, खाजगी ट्रॅव्हल्स देखील पूर्णपणे डॉ. आंबेडकर चौकातून हटलेल्या पाहिजेत, त्यांना इतरत्र दुसरीकडे थांबा देण्यात यावा आंबेडकर चौकामध्ये नागरिकांना जाण्या येण्यासाठी जागा मोकळी करून द्यावी, अतिक्रमण हटवावे एसटीला योग्य ठिकाणी थांबा द्यावा जेणेकरून प्रवाशांना सोयीचे होईल आणि एसटीचे उत्पन्न वाढेल यासाठी विचार करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे













































