वाशिम : सागर कोकस यांच्या वक्तव्याने नगर परिषद निवडणुकीत खळबळ
वाशिम : सागर कोकस यांच्या वक्तव्याने नगर परिषद निवडणुकीत खळबळ
वाशिम : नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार सागर कोकस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अचानक तापले आहे. प्रचारसभेत कोकस यांनी “विरोधक पैसे देत असतील तर त्यांचे घ्या” असे विधान केल्याचा व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर वाशिममध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
या वक्तव्याचा विरोधकांनी तात्काळ समाचार घेत, “मतदारांना चुकीचा संदेश देण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न” असा आरोप केला आहे. काही पक्षांनी ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
शहरातील सामाजिक संघटनांनीही या विधानाचा निषेध नोंदवित, “अशा प्रकारचे संदेश लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारे असून मतदारांची दिशाभूल करणारे” असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर सागर कोकस यांचे वक्तव्य प्रचंड वेगाने व्हायरल झाले असून नागरिकांमध्येही या संदर्भात मोठी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, सागर कोकस यांनी या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसून त्यांच्या निवडणूक प्रचारावर याचा नेमका काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाशिम नगर परिषद निवडणुकीत हे प्रकरण आता प्रमुख चर्चेचा विषय ठरले असून राजकीय वातावरणात नव्या खळबळीला सुरुवात झाली आहे.














































