आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणशेती विषयीसरकारी योजनासामाजिक कार्य

दुग्ध विकास प्रकल्प टप्पा क्र. २ हा उदगिरच्या दूध भुकटीसाठी राज्याला दिशा देणारा ठरणार

दुग्ध विकास प्रकल्प टप्पा क्र. २ हा उदगिरच्या दूध भुकटीसाठी राज्याला दिशा देणारा ठरणार
एन.डी.डी.बी. ने पुढाकार घेण्याची गरज

उदगीर — विदर्भ व मराठवाडा विभागातील १९ जिल्ह्यांमध्ये राज्याच्या कृषि,पशु,दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने सन २०२४-२५ ते २०२६-२७ या कालावधीत राबविण्यात येणारा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ हा उदगीरच्या दूध भुकटी प्रकल्पासाठी दिशा देणारा ठरणारा आहे.याबाबतचे आदेश शासनाच्या पदुम विभागाने १६ सप्टेंबर२४ रोजीच काढले आहेत.मात्र उदगीरचा बंद पडलेला दूध भुकटी प्रकल्प पूर्ववत सुरू करून, दूध खरेदी -विक्री ची सक्षम यंत्रणा उभी करण्यासाठी एन. डी. डी. बी. ने पुढाकार घेण्याची गरज आहे.
सन २०२८ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने पथदर्शी आराखडा अहवाल शासनास सादर केला होता. सदर अहवालात राज्याच्या विकासाला गती देत असताना आधीच अस्तित्वात असलेला असमतोल कमी करण्याचा विचार केला पाहिजे, असे नमुद करुन, ज्या जिल्हयांचा राज्याच्या “सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये” कमी सहभाग आहे, अशा जिल्हयांमध्ये सर्वसमावेशक, शाश्वत, आणि संतुलित विकासात्मक वाढ होईल याची खात्री करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली आहे.
राज्याची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचविण्यासाठी ज्या ७ घटकांना चालना देण्याची आवश्यकता स्पष्ट केली आहे, त्यामध्ये शेती व शेतीपुरक व्यवसायांचा समावेश आहे. शेतीपूरक व्यवसायामध्ये या विभागाशी संबंधित असलेल्या दुग्धव्यवसायाचा समावेश आहे.
सन २०२२-२३ मधील आकडेवारीनुसार दुग्धोत्पादनात देशपातळीवर महाराष्ट्राचा सहावा क्रमांक लागतो. देशात दरडोई दुध सेवनाचे प्रमाण ४५९ ग्रॅम प्रति व्यक्ती प्रति दिन असे असून, पंजाबमध्ये हेच प्रमाण १२८३ ग्रॅम प्रति व्यक्ती प्रति दिन आहे. राज्यात हे प्रमाण ३२९ ग्रॅम प्रति व्यक्ती प्रति दिन इतके आहे. त्यामुळे राज्यात दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यास वाव आहे. राज्यातील पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय एकवटलेला असून, त्याप्रमाणात विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध व्यवसाय केला जात नाही. दुग्ध व्यवसाय हा शेतीपुरक व्यवसाय असून त्याद्वारे पशुपालक- शेतकरी यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. विदर्भ व मराठवाड्यात कमी पर्जन्यमानामुळे शेतीपासून शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे सदर भागात शेतकरी आत्महत्येतेचे प्रमाण जास्त आहे. यास्तव तेथील शेतकऱ्यांना जोडउत्पनाचे साधन उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त ठरते.
या पार्श्वभूमीवर विदर्भ व मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सन २०१६ ते २०२२ या कालावधीत “विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प-टप्पा-१” हा कार्यक्रम राबविण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाची फलश्रृती, सदर कार्यक्रम राबवितांना आलेले अनुभव विचारात घेवून विदर्भ व मराठवाड्यातील सर्व म्हणजे १९ जिल्ह्यांमध्ये दुग्धोत्पादनाच्या वाढीस चालना देण्यासाठी “दुग्ध विकास प्रकल्प-टप्पा-२ राबविण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दि. १३ ऑगस्ट, २०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली होती. त्यानुषंगाने शासनाने हा टप्पा क्र-२ राबविण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
टप्पा -२ राबविण्यासाठी दूध विक्रीची यंत्रणा सक्षम झाली पाहिजे.यासाठी उदगिरचा बंद पडलेला दूध भुकटी प्रकल्प पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे.राष्ट्रीय दूध डेअरी विकास बोर्डाकडून (एन. डी. डी .बी.) दूध खरेदीची यंत्रणा उभी केल्यास दूध भुकटी प्रकल्पासाठी लागणारे दूध कमी पडणार नाही. शिवाय शेतकरी-पशुपालकांना जोडधंदा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही कमी होवून उदगिरचा दूध भुकटी प्रकल्प राज्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे. हे सांगण्यासाठी आता कोण्या जोतिष्याची गरज राहिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button