दर सोमवारी होणार मोफत आरोग्य तपासणी.
दर सोमवारी होणार मोफत आरोग्य तपासणी.
माजलगाव येथील ढुंढिराज टेंबे गणेश मंडळ आणि कै.वि.मा.खोडसकर गुरूजी स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम
उस्माननगर (गणेश लोखंडे)- येथील श्री ढुंढिराज टेंबे गणेश मंडळ आणि कै. वि. मा. खोडसकर गुरूजी स्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दर सोमवारी श्री टेंबे गणेश मंदिर मंगल कार्यालयात दर सोमवारी मोफत रूग्ण तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्री ढुंढिराज टेंबे गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. अनंत शास्त्री जोशी यांनी दिली. श्री ढुंढिराज टेंबे गणेश मंडळाच्या वतीने सातत्याने सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, याचाच एक भाग म्हणून सोमवारी (दि.२४) श्री ढुंढिराज टेंबे गणेश आणि धन्वतरी पूजानाने करण्यात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी डॉ.प्रकाशराव खोडसकर यांचेसह श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विश्वासराव जोशी, प्रभुप्रसाद माध्यम समुहाचे परमेश्वर लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील मस्जिद चौक येथे कै. वि.मा. खोडसकर गुरूजी स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.प्रकाशराव खोडसकर यांचे गेल्या अनेक वर्षापासून रूग्णालय होते. या रूग्णालयात दर सोमवारी रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत होती. मात्र, गतवर्षी डॉ.खोडसकर यांनी काही तांत्रिक अडचणीतून आपले रूग्णालय बंद केल्यामुळे या भागातील रूग्णांची गैरसोय होत होती. रूग्णांची अडचण लक्षात घेऊन श्री ढुंढिराज टेंबे गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांनी, परत आपण मोफत रूग्णसेवा सुरू करावी अशी विनंती केल्यानंतर डॉ.खोडसकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार देत, दर सोमवारी सकाळी १० ते दुपारी ०१ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी करण्यास होकार दिला.
श्री ढुंढिराज टेंबे गणेश मंडळ आणि कै. वि.मा.खोडसकर गुरूजी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मठगल्ली, ब्राम्हणगल्ली, झेंडाचौक, सिरसट गल्ली आदी भागातील रूग्णांना मोठा लाभ होणार आहे. जास्तीत जास्त रूग्णांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन उभय प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.विश्वासराव जोशी यांनी केले, तर उपक्रमाच्या आवश्यकतेबाबत श्री टेंबे गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. अनंतशास्त्री जोशी यांनी आपली भूमिका मांडताना, आरोग्यसेवे सोबतच, आता मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी संस्कार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. अतिशय टुमदार अशा या छोटेखानी कार्यक्रमाला अंबादास देशमुख, विश्वनाथ जोशी, सुरेंद्र जोशी, सुधाकर भाऊ, सुधिर देशमुख, शेरुभाई, बबन महाजन, ओंकार जोशी, उध्दव जोशी, भैय्यासाहेब मुळी यांच्यासह श्री टेंबे गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
__________________